कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर
कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज आदी प्रवर्तक कवींच्या परंपरेचा वारसा चालवून, पुढे स्वत:चे अस्तित्व व श्रेष्ठत्व सिद्ध करून एक स्वतंत्र काव्य-प्रवाह निर्माण करणारे कवी!
एक श्रेष्ठ कवी म्हणून कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर जेवढे लोकप्रिय होते, तेवढेच ते नाटककार म्हणूनही लोकप्रिय होते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळून त्या सार्या प्रांतांत आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे एक उच्च प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज होत. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु त्यांचे काका -वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिवाडकर असे झाले.
पुण्यामध्ये जन्म झालेला असला, तरी त्यांचे शिक्षण नाशिक येथे झाले. बी.ए. झाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लेखन, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. नंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
सामाजिक अन्याय व विषमता यांवर त्यांच्या लेखणीने कठोर प्रहार केला. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि ते त्यांनी आपल्या कृतीतून व लेखनातून वारंवार प्रकट केले. १९३२ साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य केले.
जीवनलहरी (१९३३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती, वादळवेल, मुक्तायन, पाथेय (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४), वादळवेल (१९६९), मारवा (१९९९) असे त्यांचे एकाहून एक सरस असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तर दुसरा पेशवा (१९४७), वैजयंती, राजमुकूट, कौंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट ही नाटके त्यांनी लिहिली. ‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट’ मधील मध्यवर्ती भूमिका करण्यात आजही मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत धन्यता मानतात. ती भूमिका आव्हानात्मक मानली जाते.
वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर अशा कादंबर्या, तर फुलवाली, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मांजर, बारा निवडक कथा असे त्यांचे काही कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. समिधा हा मुक्तकाव्यसंग्रह , तसेच ‘आहे आणि नाही’, विरामचिन्हे, वाटेवरच्या सावल्या, प्रतिसाद हे ललित लेखसंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे.
‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ (कोलंबसाचे गर्वगीत) किंवा ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असे ओजस्वी, तेजस्वी शब्द वापरून त्यांनी मनामनात जसा क्रांती-जोष भरला, तसाच पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात... अशी विलक्षण हळुवार, तरल कविता लिहून प्रेमाचा संदेश मराठी मनामनापर्यंत पोहोचवला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या कवितेतून त्यांनी अक्षरश: इतिहासही जिवंत केला. पुढे ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ लिहून भारतमातेची व्यथा जनतेसमोर मांडली, लोकांच्या डोळ्यात अंजन घातले.
केशवसुत, मर्ढेकर, गोविंदाग्रज, सावरकर, रविकिरण मंडळातील कवी... आदी कवींचा प्रभाव कुसुमाग्रजांवर होता. तो प्रभाव, तो संस्कार घेऊन त्यांनी पुढे स्वत:ची एक काव्यधारा निर्माण केली. सामाजिक कविता, देशभक्तीपर कविता, प्रेम-विरहपर कविता, ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन करणार्या कविता, आध्यात्मिक आशायाच्या कविता, निसर्गकविता असे सर्व कविताप्रकार त्यांनी लीलया हाताळलेले दिसतात.
त्यांच्या ‘विशाखा’ ह्या काव्यसंग्रहावर मराठी रसिकांनी मनापासून प्रेम केले. ऐन स्वातंत्र्यलढ्यात (१९३० ते १९४०) या संग्रहातील कविता त्यांनी लिहिल्या होत्या. अक्षरश: पूर्ण काव्यसंग्रह पाठ असणारे अनेक रसिक आजही सापडतील, अशी त्यांच्या विलक्षण प्रतिभेची आणि लोकप्रियतेची किमया आहे. घाटबंद-रेखीव-प्रमाणबद्ध रचना, कल्पनावैभव, उत्कटता, चिंतनशीलता, राष्ट्रीयता, समाजाभिमुखता ही त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या या लेखनसेवेचा यथोचित गौरव ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७-८८) देऊन करण्यात आला. हा साहित्य क्षेत्रातील देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक होत.
इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. ‘तात्यासाहेब’म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणार्या कुसुमाग्रजांनी मुंबई येथे योजलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्षपद भूषवले. त्या आधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (१९६४,गोवा) आणि नाट्य संमेलनाचे(१९७०,कोल्हापूर) अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. सन २००३मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. असा बहुमान मिळवणारे ते पहिलेच मराठी साहित्यिक होत. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठीवर प्रेम करणार्या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांच्या रूपाने मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा मानदंड महाराष्ट्राला लाभला असे मानले जाते ते उचितच आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून रसिकांनी व मराठी साहित्यिकांनी त्यांची स्मृती जतन करून ठेवली आहे.