Get it on Google Play
Download on the App Store

डॉ. इरावती कर्वे

डॉ. इरावती कर्वे

मानवशास्त्र व समाजशास्त्र या विषयांतील जागतिक कीर्तीच्या संशोधिका; तितक्याच उत्कृष्ट लेखिका आणि स्वत:च स्त्री-स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत!

समाजाबद्दलचे लोकांचे आकलन समृद्ध करणार्‍या; सामाजिक, सांस्कृतिक व शारीरिक मानव- शास्त्रावर प्रभुत्व सिद्ध करणार्‍या जागतिक कीर्तीच्या संशोधक डॉ. इरावती कर्वे यांचा जन्म ब्रह्मदेशात झाला.

मूळच्या इरावती गणेश करमरकर यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, आणि १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्याच वर्षी त्यांचा विवाह महर्षी कर्वे यांचे चिरंजीव डॉ. दिनकर कर्वे यांच्याशी झाला. ज्येष्ठ समाज-शास्त्रज्ञ डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ’परशुरामाबाबत दंतकथा’ व ’चित्पावन ब्राम्हण’ अशा दोन प्रबंधांचा अभ्यास करून त्यांनी १९२८ साली मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी मिळवली. १९२८-३० या काळात बर्लिन विद्यापीठातून ’मानवी कवटीच्या भागांचे एकमेकांशी प्रमाण’ या विषयावर त्यांनी पी.एच.डी. केली. पुढे त्यांनी काही काळ एस. एन. डी. टी. विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिले.

इरावतीबाई महाराष्ट्रात त्यांच्या मराठी साहित्यातील लेखन कर्तृत्वामुळे प्रसिद्ध आहेत; परंतु जगात त्या त्यांच्या भारतातील नातेदारी व्यवस्थेवरील अभ्यासासाठी; ’भारतातील नातेदारी पद्धतीने संघटन’ या पुस्तकामुळे (भारतातील कुटुंबव्यवस्था व नातेसंबंध यांचा संशोधनात्मक आढावा घेणारे पुस्तक) मानव-शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. या पुस्तकात इरावतीबाईंनी भारतातील सर्व भाषिक समूहांतील नातेवाचक संज्ञांचा तपशीलवार आढावा घेतला आहे. इरावतीबाईंनी शास्त्रज्ञ म्हणून मानवशास्त्राच्या सर्व उपशाखांच्या - सामाजिक, सांस्कृतिक, शरीरमानवशास्त्र, पुरातत्त्वविज्ञान, भाषाविज्ञान या उपशाखांच्या - अध्ययनात व लेखनात आपला ठसा उमटवला आहे. इरावतीबाईंनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.

समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.

ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.

मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh  अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते - असे त्यांचे पाठांतर होते.

इरावतीबाई स्वतंत्र विचारांच्या व स्वत:ला पटणारी गोष्ट निकराने करणार्‍या होत्या. स्वतंत्रपणे काम करणार्‍या संशोधक असा त्यांचा पिंड होता. त्यांनी व्यासंगी प्राध्यापक, संशोधक, लेखिका, व्याख्याती अशा माध्यमांतून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला. पुण्यातील सुप्रसिद्ध डेक्कन कॉलेज येथे इरावतीबाईंनी सुमारे ४० वर्षे मानवशास्त्र विभागात प्रमुख म्हणून कार्य केले, संशोधन केले. तसेच काही काळ पुणे विद्यापीठात समाजशास्त्राचे अध्यापन केले.

इरावतीबाई या एक चैतन्यमयी आणि चैतन्यदायी स्त्री होत्या. त्यांचे सहप्राध्यापक, अगदी तरुण विद्यार्थी-विद्यार्थीनी यांना लाजवेल असा त्यांचा (अभ्यास, संशोधन, भटकंती याबाबत) उत्साह असे. दुचाकी (स्कूटर) चालवणार्‍या पुण्यातील पहिल्या महिला (१९५२) असाही त्यांचा लौकिक आहे. ‘स्त्री-स्वातंत्र्या’ बाबतच्या त्यांच्या कल्पना अतिशय आधुनिक होत्या. त्या काळी स्त्री-स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या स्त्रियांना उद्देशून त्या म्हणत, ‘बायांनो, पुरुषांशी भांडताना फक्त समान हक्कांसाठी काय भांडता? नेहमी जास्त हक्कांसाठी भांडत जा.’

दुसर्‍या महायुद्धानंतर सांस्कृतिक मानवशास्त्र व सामाजिक मानवशास्त्र यांचा स्वतंत्र शास्त्रे म्हणून विकास झाला. या विषयांचा सखोल, संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी संस्कृती व इतिहासाचे विश्र्लेषण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, अशा प्रकारचे संशोधनात्मक कार्य करणार्‍या डॉ. इरावती कर्वे या जगातील एकमेवाद्वितीय शास्त्रज्ञ होत. त्यांच्यामधील संशोधक, त्यांचे चिरंजीव डॉ. आनंद कर्वे यांच्या माध्यमातून आजही समाजासाठी कार्यरत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे