Get it on Google Play
Download on the App Store

पंडित भीमसेन जोशी

पंडित भीमसेन जोशी

शास्त्रीय संगीताच्या अवकाशात तेजाने तळपणारा ‘स्वरभास्कर’असूनही, स्वत: जमिनीवरच  राहणारा, आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करणारा तपस्वी कलावंत !

 

अमृताचे डोही। बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही। धन्य झालो।।

मी पण संपले। झालो विश्वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा।।

हे आहेत ‘ज्ञानपीठा’ने  ‘भारतरत्ना’बद्दल काढलेले उद्‌गार, म्हणजेच कविवर्य विंदा करंदीकर यांची पंडित भीमसेनजींवरील प्रतिक्रिया!

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ख्याल गायकीचा राजा म्हणून पंडित भीमसेन जोशींना ओळखले जाते. पंडित भीमसेनजी हे पारंपरिक किराणा घराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याच्या गायकीचे प्रगल्भ रूप भीमसेनजींच्या गाण्यातून प्रकट होते. भारतीय शास्त्रीय संगीत देशात आणि परदेशात लोकप्रिय करण्यामध्ये भीमसेनजींचे मोलाचे योगदान आहे.

भीमसेनजींचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गदग या गावी झाला. भीमसेनजींचे संगीतावरील प्रेम इतके विलक्षण होते की, लहानपणी ते सुरांच्या ओढीने मशीदीत जाऊन बसत. तसेच शाळेत जाता-येता तासनतास रेकॉर्डच्या दुकानापाशी उभे राहून गाणी ऐकत व तशीच्या तशी ती गाणी म्हणत. लहानपणापासून संगीताची आवड असणार्‍या भीमसेनजींनी वयाच्या १२ व्या वर्षी संगीत शिक्षणासाठी घर सोडले. रिकाम्या खिशाने व उपाशी पोटाने त्यांनी मैलोनमैल प्रवास केला. अब्दुल करीम खाँ, वझे बुवा, केसरबाई केरकर यांसारख्या मातब्बर गवयांचे गाणे त्यांनी ऐकले. मिळेल तिथून गायनविद्या ग्रहण केली. अनेक गुरूंचे शिष्यत्व पत्करले व शेवटी रीतसर  रामभाऊ कुंदगोळकर(सवाई गंधर्व) यांच्याकडून तालीम घेतली. कुंदगोळ गावी गुरुगृही राहून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक गायनविद्या संपादन केली. गुरूंच्या मनाप्रमाणे सूर लागत नाही म्हणून एकदा गुरूंनी त्यांना आडकित्ता फेकून मारला होता. या एका प्रसंगावरूनच भीमसेनजींनी केलेल्या परिश्रमांची, रियाजाची कल्पना येते. भीमसेनजींनी ज्या काळात गायनास सुरुवात केली, तो काळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीचा. त्या काळात संगीतातील घराणेशाही अधिक घट्ट होत होती. मात्र भीमसेनजींनी -किराणा घराण्याची वैशिष्टये राखत -यापलीकडे जाऊन स्वरसाधना केली आणि भीमसेनजी म्हणजे एक प्रचंड ताकदीचे स्वयंभू व्यासपीठच झाले.

१९४६ साली पुण्यातील हिराबागेत त्यांची पहिली जाहीर बैफील झाली व महाराष्ट्राला भीमसेनी गायकीचे प्रथम दर्शन झाले. त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भारदस्त, भरदार, गोल, सुरेल असा आवाज. त्यांच्या आवाजाचे मर्मस्थान किंवा त्यांच्या गाण्याचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचा कानात घुमणारा, रुंजी घालणारा आवाज होय. त्यांच्या आवाजात रस आहे, वजनआहे, स्वर-शब्द पेलण्याची ताकद आहे. त्यांचा आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरतो, तानपुर्‍याशी चटकन एकजीव होतो. त्यांचं श्वासावर जबरदस्त नियंत्रण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या शक्तिस्थानांचा गाताना यथायोग्य उपयोग करण्याची प्रतिभाही त्यांच्याकडे आहे. स्वरांचा आनंद स्वतः घेत गाण्याच्या वृत्तीने ते रसिकांना संगीताचा पूरेपूर आनंद देतात. शास्त्रीय गायन, नाट्यगीत, ठुमरी, भजन या अनेक संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा आहे. त्यांची शब्दांची फेक व बंदिशींचे उच्चारण सौंदर्यपूर्ण असते. हिंदी, मराठी, कन्नड या तीनही भाषेतील त्यांचे अभंग लोकप्रिय आहेत. त्यांच्या सुप्रसिध्द अभंगवाणीमुळे अनेक संतपदे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. त्यांचे ‘आता कोठे धावे मन’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘काया ही पंढरी’,‘ तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’,  ‘ज्ञानियांचा राजा’ हे अभंग ऐकताना साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडतं. अभंगवाणी ही पंडितजींनी महाराष्ट्राला दिलेली भक्तिरसपूर्ण अशी अनमोल देणगी आहे.

त्यांनी देशात, परदेशात शास्त्रीय गायनाच्या अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत. आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते पुणे येथे दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करतात. गेली ५० हून अधिक वर्षे चालणार्‍या ह्या संगीत महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी भारतातील तसेच परदेशातीलही असंख्य श्रोते उपस्थिती लावतात. शास्त्रीय गायन व वादन, तसेच नृत्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत या महोत्सवात आपली कला सादर करण्यात धन्यता मानतात.

 

पुणे विद्यापीठाच्या ललितकला केंद्रात पंडित भीमसेन जोशी अध्यासन स्थापन झाले आहे. पंडितजी गेली पन्नास-साठ वर्षे अखंड संगीताची साधना करीत आहेत. त्यांना अनेक मान-सन्मान लाभले आहेत. संगीताचार्य, पद्मश्री, पद्मभूषण, पुण्यभूषण, स्वरभास्कर, तानसेन यांसारख्या अनेक पुरस्कारांनी व पदव्यांनी ते सन्मानीत आहेत. पुणे व गुलबर्गा विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट दिली, तर टिळक विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली आहे. नुकताच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना जाहीर झाला आहे. हा बहुमान जाहीर झाल्यानंतर संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केलेला आनंद व त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर , तसेच अवघ्या महाराष्ट्रातील मराठी जनांच्या मनातील आनंदाची लहर अनुभवल्यानंतर पंडित भीमसेन जोशी या गायकाचा ‘उच्च दर्जा’; या कलाकाराची ‘महानता’ आणि या माणसातील ‘माणूसपण’ आपल्या लक्षात येते.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे