Get it on Google Play
Download on the App Store

शाहीर अमर शेख

शाहीर अमर शेख

पारतंत्र्याचे साखळदंड तोडण्यासाठी महात्माजींच्या अहिंसेची शक्ती जेवढी कामी आली, तेवढीच जहालवाद्यांची सशस्त्र मुसंडीही महत्त्वाची ठरली. स्वातंत्र्यापर्यंत पोहोचणार्‍या या खडतर मार्गावरून चालताना संसाराची आहुती देऊन भारतमातेची सेवा करण्याची प्रेरणा मनामनात प्रज्वलित होती. स्वतंत्र भारतात सुखी नागरिक म्हणून राहताना या लढवय्यांनी ही उर्जा कशी टिकवून ठेवली असेल असा प्रश्र्न पडतो. सखोल विचार करता त्याचे एक उत्तर सापडते ते सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या तत्कालीन कवी, शाहीर, वक्ते, पत्रकार आणि राजकीय वक्ते यांच्या धगधगत्या शब्दभांडारात.

कम्युनिझमचा लाल बावटा आणि तो विचार मनावर बिंबवून, सामाजिक क्रांतीसाठी तळमळीने जनजागृती करणारे शाहीर मेहेबूब हसन शेख उर्फ अमर शेख हे अशाच शाहीरांपैकी एक.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी जन्मलेले मेहेबूब हसन शेख लहानपणापासूनच गायकीकडे आकर्षिले गेले होते. मुन्नेरबी ही त्यांची अशिक्षित माता त्यांना ओव्यांच्या माध्यमातून परिस्थितीची जाणीव करून देत होती

‘मेरे नसीबकी। मै क्या बोलू कानी (कहाणी)

तू सुनले धीरजपानी। तेरे नयन ढले पानी।।

तिच्या आयुष्याची परवड, पतीसुख नाहीसे झाल्यानंतरचे तिचे जीवन - याचेही वर्णन त्या करतात.

जिणं असं जिणं, कुत्र्यालाही नसावं।

तेच माणसाच्या वाट्याला, का गं यावं।।

तिच्या आयुष्याची ही परवड झालेली असतानाही तिने आपल्या मुलाला राष्ट्रप्रेमाचे आणि मातृप्रेमाचे संस्कार दिले.

काव्य, मानवता, भक्ती आणि मुक्तीचे बाळकडू घेऊन मेहेबूब वाढला. त्याच्या वात्सल्यमयी मनाला त्याच्या टीपेच्या व श्रवणीय आवाजाची साथ लाभली आणि त्याने भरतभूमीच्या सेवेची सुरुवात केली.

आईविषयीच्या त्यांच्या भावना अतिशय उत्कट आहेत.

आईविषयी लिहीताना ते म्हणतात -

‘तूच दाविले विश्व मनोहर, हे परमेश्र्वर आई,

तूझ्याविना या जगी दुजा मज, गे परमेश्र्वर नाही’

१९३०-३१ च्या दरम्यान कायदेभंग आंदोलन सुरू झाले. त्या वेळी मेहेबूब नावाचा धार्मिक एकात्मतेचा दीपस्तंभ ‘प्रभुराया, धाव आता’ अशी विनवणी देवाला करू लागला. दरम्यान गिरणीच्या साच्यावर काम करण्याची नोकरी त्यांना मिळाली. पण मंदीच्या लाटेत तीही सुटली. कामगारांनी संप केले, उठाव केले यातच मेहेबूब शेख यांना विसापूर जेलमध्ये तुरुंगवास भोगावा लागला. पण ही जेलयात्रा त्यांच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. तुरुंगात त्यांना कॉम्रेड रघुनाथ कर्‍हाडकर भेटले आणि मेहेबूब शेख लाल बावटा हाती घेऊन कम्युनिझमचा वारसा जपत गावोगावी फिरू लागले. आपल्या गीतांनी त्यांनी समाजाला जागे गेले. स्वत:चीच शब्दरचना, स्वत:चेच संगीत आणि स्वत:चाच आवाज यांच्यासह त्यांनी अनेक चळवळीत, आंदोलनांत प्राण फुंकले.

‘ज्यांनी आम्हा गरिबास्नी नाडलं हो,

त्यांच्या तिजोरीला भोक पाडलं.’

अशा गीतांनी त्यांनी पोलिसांचा ससेमिरा पाठी लावून घेतला. लपत-छपत कोल्हापूर गाठलं. तेथे त्यांनी मास्टर विनायकांच्या नवयुग स्टुडिओत आसरा मिळवला. देशभक्तांसाठी आसरा असलेल्या नवयुगमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना खर्‍या नावाने बोलावणे बंद झाले आणि सगळे त्यांना अमर भय्या म्हणू लागले. येथूनच मेहेबूब हसन शेख यांचे रूपांतर शाहीर अमर शेख यांच्यात झाले.

परिस्थितीचे आघात झेलत, ‘लुटावया जीवन भांडार, या रे, धडका फोडा दार’

असे म्हणत त्यांचा पुणे, मुंबई असा प्रवास झाला. १९४२ च्या चळवळीने त्यांच्या मनावर वेगळाच प्रभाव टाकला. परकीयांची बेबंदशाही, नराधम वृत्ती त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली आणि आता या समाजाला चेतविण्यासाठी या समरात आयुष्य झोकून द्यायला हवे याची जाणीव त्यांना झाली.

चले जाव चळवळ सुरू झाल्यानंतर,

‘चले जाव  चले जाव  चले जाव

चले जाव माजोरी ऐतखाऊ उन्मत्त पशुंनो जाव,

गोरे काळे सगळे बगळे जाव जाव चले जाव. ’’

अशी घोषणा त्यांनी दिली.

कष्टकर्‍यांच्या बाजूने उभे राहणार्‍या अमर शेख यांनी  ‘न्याय अन्यायाची बातच नाही,  मजूर शेतकरी तय्यार हाथी’  अशी ललकारीही दिली.

कष्टकर्‍यांबद्दलच्या, शेतकर्‍यांबद्दलच्या त्यांच्या भावना सांगणार्‍या ह्या कवनातून त्यांच्या प्रतिभेचा, जाणिवांचा अंदाज आपल्याला येतो.

काळ्या आईचा सखा पुत्र तू ,

तूच खरा घनश्याम,  राजा कुणबी हरे राम।।

ब्रह्मा होऊन तूच निर्मिले। निर्मियले जग सारे

महादेव तू पार्वती शंकर। रूप कधी तव महाभयंकर

त्रिभुवन जाळून भस्म लावून पुन्हा तू भोळा सांब।।

शाहीर अमर शेख यांनी आपल्या आयुष्यात अनेक भूमिका बजावल्या. क्लीनर, पाणक्या व गिरणी मजूर म्हणून त्यांनी काही काळ काम केले. पुढे कामगार नेते म्हणूनही त्यांनी कार्य केले. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या सर्व महत्त्वपूर्ण चळवळींत त्यांनी आपले शब्द, सूर अन्‌ आपला पहाडी, सुरेल आवाज यांच्या साहाय्याने अनमोल योगदान दिले. त्यांनी निधीही उभा केला. ज्येष्ठ साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय शाहीर’ या शब्दांत यथार्थ गौरव केला. शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व शाहीर गव्हाणकर ह्या त्रिकूटाने त्या काळात महाराष्ट्र दणाणून सोडला होता. त्यांचे लाल बावटा पथक हे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. साम्यवादी पक्षाचे तर ते प्रचारकच होते. आपल्या लेखणी आणि आवाजाच्या माध्यमातून त्यांनी साम्यवादी विचारसरणीचा प्रचार केला. पक्ष-कार्यामुळे ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध झाले. त्यांच्या शाहीरी कलापथकाला मिळालेल्या मोबदल्यातून त्यांनी बहुजन समाजातील शैक्षणिक प्रसाराच्या कार्यासाठी लाखो रुपये देणगी म्हणून दिले.

अमरगीत हा गीतसंग्रह; कलश व धरतीमाता हे काव्यसंग्रह आणि पहिला बळी हे नाटक - हे त्यांचे साहित्य प्रकाशित व प्रसिद्ध आहे. ‘माझा देहचि धरतीमाता, हा कुराण ही माझी गीता’ - अशा ओळींतून त्यांच्यातील प्रगल्भ कवी आपल्यासमोर येतो. ‘जय महाराष्ट्र’ हा संयुक्त महाराष्ट्रावरील पोवाडा; छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकथन करणारा पोवाडा, मल्हारराव होळकरांवरील पोवाडा - असे त्यांचे पोवाडे सुप्रसिद्ध आहेत. संपूर्ण समाजाने एकत्र येऊन ‘शिवबा’ बनावे आणि सत्तेचा नांगर आपल्या जरबेत चालवावा, हे त्यांचे विचार आजही लागू पडतात. ‘वक्त की आवाज’ हा क्रांतिगीत संग्रह त्यांनी संपादित केला. ‘युगदीप’ या मासिकाचे संपादकपदही त्यांनी काही काळ सांभाळले.

   

गरीब जनता, कामगार, शेतकरी यांच्याविषयी मनात अपार करुणा असणारे अमर शेख हे राजकीय कार्यकर्ते, कामगार नेते, गायक, कवी व शाहीर होतेच, तसेच ते अभिनेतेही होते. ‘प्रपंच’ व ‘महात्मा जोतिबा फुले’ या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांच्या अभिनयाचे देशभर कौतुक झाले. आयुष्यात अनेक प्रकारचे कार्य मनापासून, तळमळीने करताना शाहीरी परंपराही त्यांनी पुढे नेली हेदेखील महत्त्वाचे! आचार्य अत्रे अमर शेख यांच्याबद्दल समर्पक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.  अत्रे म्हणतात, ‘अमर शेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी व बेहोषी ह्यांची जिवंत बेरीज.’

आयुष्यभर अनेक चढ-उतार पाहूनही व दारिद्रयाची परिसीमा अनुभवतानाच देशभक्तीचा वसा-वारसा अखंड जपणारे हे राष्ट्रीय शाहीर २९ ऑगस्ट, १९६९ रोजी अनंतात विलीन झाले.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे