सुनील गावस्कर
सुनील गावस्कर
भारतीय क्रिकेटविश्र्वात विजीगिषू वृत्ती जागवणारे आणि भारत जिंकू शकतो हा आत्मविश्र्वास निर्माण करणारे क्रीडापटू!
१९७१ साल, वेस्ट इंडिजमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका चालू होती. त्या वेळी भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचा खेळाडू - ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-विंडिजच्यां तोफखान्यासारख्या भासणार्या, अक्षरश: आग ओकणार्या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या भूमीत सामना जिंकला, मालिकाही (१-०) जिंकली. पुढे जाऊन याच क्रिकेटपटूने क्रिकेटच्या इतिहासात आपले एक वेगळे, उच्चतम स्थान निर्माण केले. त्या खेळाडूचे नाव सुनील मनोहर गावस्कर.
लिटिल मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील गावस्कर यांचा जन्म १९४९ मध्ये झाला. सुनील गावस्कर यांच्या घरातील वातावरण क्रिकेटमय होते. त्यांचे वडील स्वत: एक क्रिकेटपटू होते. मामा माधव मंत्री हेदेखील एक चांगले कसोटी खेळाडू होते. सुनील यांच्या आईने तर त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. एकंदरीत घरातील क्रिकेटने भारलेले वातावरण सुनीलमध्ये दडलेल्या खेळाडूला जागवण्यात महत्त्वाचे ठरले.
१९७० साली सुनील यांची निवड रणजीसाठी झाली. या वेळी पहिल्या दोन डावात त्यांच्याकडून विशेष कामगिरी होऊ शकली नाही. परंतु तिसर्या डावात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, प्रभावी फिरकी गोलंदाजासमोर त्यांनी शतकी कामगिरी केली. १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत देण्यात आलेल्या संधीचे त्यांनी सोने केले. याच मालिकेतील एका सामन्यात पहिल्या डावात शतक व दुसर्या डावात द्विशतक करणारा दुसरा खेळाडू होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला.
१९७५ ते १९८६ हे सुनील गावस्कर यांनी गाजवलेले दशक. त्यांच्या पूर्ण १७ वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीत ह्या दशकात त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला. या कालावधीत सातत्याने आत्मपरीक्षण करत त्यांनी क्रिकेटबाबत स्वत:चे असे शास्त्रशुद्ध तंत्र विकसित केले. वेगवेगळ्या देशातील हवामान आणि खेळपट्टी यांचा अभ्यास करून, त्याप्रमाणे खेळाचे नियोजन केल्यामुळे परदेशातील खेळपट्ट्यांवरदेखील त्यांनी उच्च दर्जाचा खेळ केला. हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
मार्शल, होल्डिंग, गार्नर... यांसारख्या गोलंदाजांचा काळ असतानासुद्धा सुनील यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा) वापर केला नाही. यावरून त्यांची अचूकता, हात-डोळे यांचा समन्वय; (Hand-Eye co-ordination) आणि त्यांचा आत्मविश्वास याची आपल्याला कल्पना येते.
कमालीची एकाग्रता, घोटलेले तंत्र, चिवटपणा (तासन्तास, दिवसेंदिवस खेळपट्टीवर उभे राहण्याची क्षमता), उत्कृष्ट संरक्षण (डिफेर्न्स), क्रीझचा उत्तम वापर आणि आघाडीचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून विशेष कामगिरी ही त्यांच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांचा १०१२२ धावांचा (कसोटीतील सर्वोच्च) विक्रम आणि कसोटीतील सर्वाधिक-३४- शतकांचा विक्रम प्रदीर्घ काळ अबाधित राहिला. त्यांच्या एकूण ३४ कसोटी शतकांपैकी सर्वाधिक १३ शतके ही त्या काळात सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांसह आघाडीवर असणार्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध काढलेली आहेत हे विशेष महत्त्वाचे! आजही परदेशातील मैदानांवर भारताची कामगिरी पाहिली, तर असे लक्षात येते की आपल्याला सामने अनिर्णित राखण्यासाठी झगडावे लागते; विजय दुर्मीळ असतात. सौरव गांगुली, महेंद्रसिंह ढोणी यांच्या काळात याबाबत बदल झाले, होत आहेत. पण बदलांचा पाया सुनील गावस्कर यांनी घातला. त्यांच्या ३४ कसोटी शतकांपैकी १८ शतके ही परदेशी मैदानांवर ठोकलेली आहेत, ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.
प्रथम श्रेणी सामन्यांतील त्यांच्या २५८३४ धावा धावांची भूक व त्यानुसार कामगिरी दर्शवतात. एक आदर्श ‘स्लीपमधील क्षेत्ररक्षक’ असाही त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. त्या काळात एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप आजच्याइतके वेगवान नव्हते. विश्र्वचषक स्पर्धांचे आयोजन होत असे, पण संघ ५० (किंवा ६०) षटकांत २२५-२५० धावांत समाधान मानत असत. सुनील गावस्कर निवृत्त होत असताना एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप पालटत होते. १९८७ मध्ये त्यांनी नागपूरच्या मैदानावर न्युझीलंडविरुद्ध ८८ चेंडूत १०३ धावा ठोकल्या होत्या. या खेळीतून त्यांनी आपले एकमेव एकदिवसीय शतक साकारले आणि आपण क्रिकेटच्या ‘या’ प्रकारातही किती उच्च दर्जा गाठू शकतो, याची झलक त्यांनी दाखवली. १९८३ च्या विश्र्वचषक विजेता भारतीय संघाचे ते महत्त्वाचे सदस्य तर होतेच.
जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला मान्यता आणि भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्याचे श्रेय सुनील गावस्कर यांच्याकडे जाते. कप्तानपदी असताना हूक, पुल यासारख्या आवडत्या फटक्यांना नियंत्रित ठेऊन, योजनाबद्ध रीतीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची कामगिरी त्यांनी अनेक वेळा पार पाडली. त्याचबरोबर विजय हजारे, मांजरेकर यांच्या परंपरेतील तंत्रशुद्ध खेळ विकसित करून त्यास सातत्याची जोड दिली. कसोटी क्रिकेटमध्ये (विशेषत: परदेशात) पराभवाची नामुष्की पत्करण्याची सवय झालेल्या भारतीय संघास पराभव टाळण्याचे व जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी आपल्या खेळाच्या साहाय्याने प्रदान केले. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये व्यावसायिकता आणण्याचे कामही गावस्कर यांनी पार पाडले.
‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ या त्यांनी गायलेल्या गाण्यातील शब्द ते स्वत: जगले, जगत आहेत. एक यशस्वी खेळाडू म्हणून अजून अधिक काळ खेळू शकत असूनदेखील कुठे थांबायचे हे माहीत असल्यामुळे १९८७ साली गावस्करांनी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.
निवृत्तीनंतरही स्तंभलेखक, उत्कृष्ट क्रीडा समीक्षक आणि समालोचक या नात्याने ते क्रिकेटशी संबंध जोडून आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटविषयक विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य म्हणूनही ते कार्य पाहत आहेत. आपल्या सफाईदार भाषाशैलीने क्रिकेट समालोचनाच्या क्षेत्रात स्वत:चे असे उच्च स्थान त्यांनी निर्माण केले आहे. सुनील स्वत: एक तंत्रशुद्ध खेळाडू असल्याने त्यांना खेळातले बारकावे माहीत आहेत. खेळाचे विश्र्लेषण ते अतिशय समर्पक शब्दांत, आकर्षक व नेमक्या पद्धतीने करतात. त्यामुळे कित्येकदा खेळ पाहावा की केवळ समालोचन ऐकत राहावे असा प्रश्र्न क्रीडारसिकांसमारे उभा राहतो. त्यांच्या ओघवत्या, समृद्ध अशा इंग्रजी भाषेच्या साहाय्याने त्यांनी या क्षेत्राला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले आहे.
क्रिकेटबरोबरच सुनील गावस्कर यांनी लेखनकला देखील चांगल्या रीतीने अवगत केलेली आहे. ‘सनी डेज’ या त्यांच्या आत्मचरित्राबरोबरच त्यांनी वन-डे-वंडर्स, रन्स अॅन्ड रुईन्स ही पुस्तकेही लिहिली आहेत. या पुस्तकांचे मराठी भाषांतरदेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर जगातील काही मोजक्या क्रिकेटपटूंच्या खेळांचे वर्णन करणारे ‘आयडॉल्स’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलेले आहे. ते अतिशय नेमकेपणाने व समर्पकतेने विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन करतात. स्तंभलेखक, समीक्षक, समालोचक या सर्व गुणांसह आणखी एक वेगळा गुण म्हणजे त्यांनी - शांताराम नांदगावकर लिखित ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ आणि ‘मित्रा तुला हे जग आहे फुलवायचे’ ही दोन - गायलेली गाणी. त्याचबरोबर त्यांनी ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिकादेखील केलेली आहे.
क्रिकेट जगतात उपखंडातील खेळाडू (भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश) आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे खेळाडू यांच्यामध्ये नेहमीच शीतयुद्ध चालू असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, विविध संबंधित आंतरराष्ट्रीय समित्या यांमध्येही - अधिकार्यांत - हे शीतयुद्ध चालू असते. या परिस्थितीत उपखंडातील खेळाडूंचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष नेतृत्व सुनील गावस्कर तळमळीने करताना दिसतात. भारतीय किंवा उपखंडीय खेळाडूंवर जर अन्याय होत असेल, तर या खेळाडूंची न्याय्य बाजू गावस्कर नेहमीच हिरीरीने मांडतात. या त्यांच्या कृतीतून भारताबद्दलचा अभिमान दिसून येतो.
क्रिकेट समालोचक, समीक्षक आणि अनुभवी खेळाडू या नात्याने आजही ते नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. अशा या हरहुन्नरी विक्रमवीराचे नाव भारतीय क्रिकेट जगतात नेहमीच अभिमानाने घेतले जाईल.
सुनील गावस्कर यांच्या नावावरील विक्रमांचा तपशील व अन्य माहिती -
- आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा १ ला फलंदाज.
- सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमधील २९ शतकांचा विक्रम मोडला. हा विक्रम करण्यास ब्रॅडमन यांना ५२ सामने खेळावे लागले तर आपल्याला ९५ सामने खेळावे लागले याची गावस्कर प्रांजळपणे कबुली देतात. या २९ शतकांमध्ये ३ द्विशतकांचा समावेश असून नाबाद २३६ हा वैयक्तिक उच्चांक आहे.