शरद पवार
आधुनिक महाराष्ट्राचा जलद गतीने, आणखी सर्वांगीण विकास साधणारे राजकीय नेते!
आजच्या घडीला कोकणापासून - विदर्भापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून - पश्चिम महाराष्ट्रापर्यंत; खेड्यातील पारापासून - मुंबईतील मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळापर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेले राजकीय नेतृत्व म्हणजे शरद पवार होत.
आपला जनाधार व राजकारण यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, दबदबा निर्माण करणारे नेते म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार यांचे नाव निश्चितपणे घ्यावे लागेल. बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावी शेतकरी कुटुंबातील जन्म ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास आश्चर्यकारक आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
राजकारण व समाजकारणाचे बाळकडू शरदरावांना त्यांच्या आईकडून मिळाले असे म्हणता येईल. त्यांच्या आई शारदाबाई पवार या स्वातंत्र्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान त्यांच्याकडे मान्यवरांचा राबता असे. हा शरदरावांच्या जडणघडणीचा काळ होता. बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शालेय शिक्षण; त्या वेळी वाद-वक्तृत्व स्पर्धांतील यश, क्रीडास्पर्धा - सहली - स्नेहसंमेलने यांच्या आयोजनातील त्यांचा पुढाकार; त्या काळातच गोवा मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी काढलेला मोर्चा.... या गोष्टींतून त्यांच्यातील नेतृत्वाची चुणूक दिसत होती, त्यांच्यातील नेता विकसित होत होता. पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतानाही जनरल सेक्रेटरी (जी.एस.) म्हणून, एक विद्यार्थी नेता म्हणून ते महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर कार्यरत होते.
येथूनच त्यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला व ते पक्षीय राजकारणात प्रवेश करते झाले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना ते आपले राजकीय गुरू मानत, आजही मानतात. यशवंतरावांनीही पवार यांच्यामधील नेतृत्वगुण ओळखले होतेच. शरद पवार यांचा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी... असा राजकीय प्रवास होत गेला. याच काळात त्यांनी महाराष्ट्रभर न थकता, डोळसपणे प्रवास केला. या काळात राज्यातील विविध भागांतील सर्वसामान्य माणसांना तर ते भेटलेच, शिवाय साहित्य, अन्य कला, क्रीडा, समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील दिग्गजांशी, मान्यवरांशी, अभ्यासकांशी त्यांचे स्वाभाविक संबंध प्रस्थापित झाले. बराच काळ ते आठवड्यातील पाच दिवस राज्यभर प्रवास करत आणि दोन दिवस मुंबईत राहत असत.
दरम्यान वयाच्या अवघ्या २६-२७ व्या वर्षी ते आमदार झाले. पुढे ते प्रदेश कॉंग्रेस सरचटिणीस झाले. १९७४ मध्ये ते मंत्री झाले, आणि १९७८ मध्ये वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. १९७८, १९८८ , १९९०, १९९३ असे चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले. दरम्यान केंद्रीय संरक्षण खात्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. सध्या ते त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत.
वरील एका परिच्छेदात आपण शरद पवार यांची सुमारे ४०-४५ वर्षांची यशस्वी कारकीर्द काही शब्दांतच वाचली. पण या यशामागे प्रचंड कष्ट आहेत. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, त्यातील कमालीचे सातत्य, शांतपणा, विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी ते पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टी... असे असंख्य गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. प्रशासकीय कौशल्ये, कार्यकर्ते-नेते शोधण्याची नेमकी दृष्टी, प्रचंड जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क... ही गुण-कौशल्येही जोडीला आहेतच. स्थानिक कार्यकर्ते - नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचे काम शरद पवार यांनी वेळोवेळी केले. त्यातून दिलीप वळसे-पाटील, आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे... आदी नेते महाराष्ट्रात पुढे आले.
आजही राज्य किंवा केंद्रीय स्तरावरील कोणतीही निवडणूक असल्यास प्रचार सभांची सर्वांत जास्त संख्या शरद पवार यांची असते. त्यांचा एकूणच वेग व झपाटा अविश्वसनीय आहे. `शरदराव राज्यात एवढे फिरले आहेत (व फिरतात) की त्यांना कोणत्याही एखाद्या वाहनचालकापेक्षाही अधिक नेमके रस्ते माहिती आहेत', असे म्हटले जाते. ही तर अगदी तांत्रिक (पण विशेष) बाब झाली, पण त्याचबरोबर ते रस्ते जिथे पोहोचतात, त्या गल्ली-बोळातील, वाडी-वस्तीवरील `माणसाच्या' मनापर्यंत जाणारे `रस्ते' हे शरदरावांना अगदी नेमके माहिती आहेत हे निश्चित!
माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ, फळबाग विकास योजना, पोलिसांची `हाफ पँट' जाऊन `फुल पॅंट' करण्याचा निर्णय, महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा साधलेला विकास, साखर कारखाने क्षेत्रातील योगदान, मुंबईतील दंगली-किल्लारी भूकंप या संकटांनंतर हाताळलेली परिस्थिती, महिला आरक्षण विषयातील भूमिका व निर्णय, माहिला बचत गटांना बळ देण्याचे धोरण, राज्यातील वंचित घटकांसाठीचे त्यांचे धोरण व त्यांचे निर्णय... त्यांच्या राजकीय कारकीर्दीची अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.
कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामती एम.आय.डी.सी, विद्या प्रतिष्ठान (शैक्षणिक संस्था), कृषिविकास प्रतिष्ठान, शारदाबाई पवार शिक्षण संस्था... आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी बारामती परिसराचा सर्वांगीण विकास साधला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द हा त्यांचा आणखी एक वेगळा पैलू. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यातील एक क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता आपण अनुभवला. आजही ते पदाधिकारी म्हणून या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत.