सावित्रीबाई फुले
भारतातील स्त्री शिक्षणाची ‘ज्ञानगंगोत्री’ आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘सत्यशोधक’ मार्गात तेवढीच तोलामोलाची साथ देणार्या क्रांतिज्योती!
काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्काचं सुख मिळविण्याची ज्यांच्यात हिम्मत असते ते असामान्य होतात. भारत नावाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फुले या अशाच असामान्य ज्ञानगंगोत्री होत.
सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील.
सावित्रीबाईंच्या जन्मावेळी इंग्रज सत्ता प्रस्थापित होऊ लागलेली. त्यामुळे वातावरण दबलेलं, लाचारीचं, पारतंत्र्याचं होतं. पण तरीही बहुतांश समाजाला इंग्रजांची सवय झालेली. याच वेळी सनातन्यांनीही उच्छाद मांडलेला. देव आणि धर्माच्या नावाखाली वर्चस्व गाजविण्यासाठी तत्कालीन सवर्ण इतर जातींचा छळ करत होते.
हिंदू समाजात या काळात स्त्री म्हणजे निव्वळ एक उपभोग्य वस्तू होती. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, एवढेच नव्हे तर ते पाप होते. ती काही मागू शकत नव्हती, तिला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार नव्हता. पुरुषांनी घालून दिलेल्या चाकोर्यांमध्ये आयुष्यभर यंत्राप्रमाणे धावत राहायचे आणि झिजत जायचे एवढंच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं.
एकूणच स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्या नागाला त्यांनी ठेचून मारलं. सनातन्यांच्या विरोधाला सामोरे जाण्याची ही तयारी त्यांनी तळमळीनं आणि धाडसानं केली.
सावित्रीबाईंच्या लग्नाच्या वेळी त्यांचं वय नऊ वर्षांचं होतं. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच! त्यांचे पती ज्योतिरावांचं वय तेरा वर्षांचं, म्हणजे तेही `मोठेच'! लग्नाला उशीर(?) झालेलं हे जोडपं फाल्गुन वद्य ५, शके १७६५ (इ.स. १८४०) रोजी विवाहबद्ध झालं. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. यावरून त्यांच्या मनात असलेले अक्षरांचे आकर्षणही दिसून येते.
एकूणच ज्ञानासाठी आतूर असलेले दोन तेजस्वी जीवनप्रवाह एक झाले होते. ‘त्यांनी करेल ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवलं. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतलं आणि भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना घडली.
१ मे, १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिडेंच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की गोर्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
दिनांक १ जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. ही अखंड हिंदुस्थानातली स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. सावित्रीबाई ‘हेडमिस्ट्रेस’ म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला.... अशा बोंबा मारून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण नकळत्या वयात नाग ठेचणार्या सावित्रीला माणसांची भीती वाटणं शक्य नव्हतं. अनेक संकटं पार करत हा ज्ञानप्रसाराचा प्रवास चालूच राहिला. घर सोडावं लागलं. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात झाले. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्र्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
एस. टी. कंडक्टरपासून ते अंतराळ यात्रीपर्यंत आत्मविश्र्वासानं वाटचाल करणार्या स्त्रीशक्तीच्या आजच्या बहुतांशी सुखावह झालेल्या जगण्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचा इतिहास आहे. वाईट ते टाकून देऊन प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार मिळावा ही सज्जनांची धडपड असते. त्यासाठी स्वत:च्या घराची, आयुष्याची पडझड झाली तरी त्यांना त्याची तमा नसते. ज्योती-सावित्री हे याच न्यायानं समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करून अखंड धडपडत राहिले.
सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. १८९६ च्या दुष्काळात माणूसकी विसरून एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणार्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
इ.स. १८९६-९७ च्या दरम्यान पुणे व परिसरात प्लेगने धुमाकूळ घातला. कुणालाच माहिती नसणारा हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर इंग्रज सरकारने एक नवीनच उपाय शोधला. रोगी दिसला की, त्याला जबरदस्तीने उचलून नेले जाई व नंतर तो कधीच परत येत नसे. तो मेला की त्याला मारले गेले, काहीच कळत नसे.
लोकांचे हे हाल सावित्रीबाईंना सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपीडीतांसाठी ससाणे यांच्या माळावर (पुणे शहराजवळ) हॉस्पिटल सुरू केले. त्या स्वत: रोग्यांना धीर देऊ लागल्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या. कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.
भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणीव देणार्या, धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून टाकणार्या समाजाला मानवतेचा मंत्र सांगणार्या, अक्षरांच्या साथीने स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणार्या, महात्मा ज्योतिरावांसारख्या महान सुधारकाचा आधार होणार्या या माउलीस प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना स्वत:च्या आयुष्याची फिकीर नव्हती. इतरांच्या जीवनज्योतींना हातांचा आडोसा धरताना सावित्रीबाईंच्या स्वत:च्या हातांना लागलेली धग त्यांना जाणवली नाही. सावित्रीबाईंना प्लेग झाला. असामान्य जीवन जगणारी ही ज्ञानगंगोत्री अखेर सामान्यांच्या प्रवाहात त्यांच्यासारखीच होऊन, त्यांच्यासाठीच विलीन झाली.