डॉ.सरोजिनी बाबर
महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि लोकशिक्षण यासाठीच आपुले आयुष्य वाहून घेणार्या , या विषयांचे पुनरुज्जीवन करणार्या महाराष्ट्राच्या `अक्का'!
मनुष्याच्या मनात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटातून असतो असे म्हणतात, त्याचप्रमाणे समाजाचा अभ्यास करायचा झाल्यास त्यांच्या संस्कृतीतून जावे लागते. विज्ञान, तंत्रज्ञान यामुळे मनुष्याच्या भौतिक सुखात वाढ होते. परंतु मानवी जीवन हे कल्पना, भावना, विचार याआधारेच प्रवाहीत होत असते. त्यामुळे लोकसंस्कृती, लोकमानस, लोकसाहित्य हेच समाजाचे (लोकांचे) अंतरंग असते, हेच वर्तमान असते. हे समाजमर्म सरोजिनी बाबर यांना उमगले होते. म्हणूनच समाज व समाजाच्या संस्कृतीकरणात त्या अधिक रमल्या.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वांगणी या लहानशा खेड्यात सरोजिनी बाबर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव बाबर हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यांच्याकडूनच लोकशिक्षणाचे बाळकडू त्यांना मिळाले. विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘कॉन्ट्रिब्युशन ऑफ विमेन रायटर्स टू मराठी लिटरेचर’ हा विषय घेऊन डॉक्टरेट मिळवली.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत सरोजिनी बाबर यांनी धडाडीने भाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९५२ ते १९५७ मध्ये मुंबई प्रांत विधानसभा सदस्य, १९६४ ते १९६६ महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि १९६८ ते १९७४ राज्यसभा सदस्य या सर्व पदांवर त्यांनी काम केले. आपला राजकीय प्रवास चालू असतानाच त्या ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’ च्या अध्यक्षा झाल्या. येथूनच त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास अधिक फुलला व त्यातच पुढे त्या अधिक रममाण झाल्या.
लोकसाहित्याचे संशोधन, संकलन, संपादन, संबंधित लेखनास प्रोत्साहन या गोष्टींवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्रभर फिरून कानाकोपर्यातून लोकसंस्कृती बाबतच्या माहितीचे संकलन त्यांनी केले. अनेक अभ्यासक, संशोधक आणि संग‘हकांना एकत्रित केले. हे सर्व साहित्य, माहिती ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य माला’ या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली.
सरोजिनी बाबर या स्वत: अतिशय बुद्धिमान होत्या. मराठी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक ओव्या, गाणी, अपौरूषेय वाङ्मय त्यांना मुखोद्गत होते. त्या स्वत:च एक चालता फिरता लोकसंस्कृती कोष होत्या. त्यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या स्वभावामुळे लवकरच त्या अनेक स्तरांतील, क्षेत्रांतील लोकांसाठी जवळच्या झाल्या. त्यांना अवघा महाराष्ट्र `अक्का' या नावानेच संबोधू लागला. प्रेमळ स्वभाव, गोड व स्निग्ध आवाज, पवित्र व्यक्तिमत्त्व; याबरोबरच त्या अतिशय शिस्तप्रिय होत्या. त्यांच्या कामातूनच हे सर्व गुण दिसून येत होते. घरातल्या थोरल्या बहिणीप्रमाणेच त्यांनी अनेक अभ्यासकांना लोकसंस्कृती, लोकसाहित्य या विषयातील अभ्यासासाठी प्रवृत्त केले. अनेक व्यक्तिमत्त्वे घडवली, अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांचे ‘अक्का’ (थोरली बहीण) हे नाव सार्थ ठरले.
‘लोकसाहित्य समिती’ च्या अध्यक्षा असताना अक्कांनी दुर्मीळ,अप्रकाशित लोकसाहित्य संकलित करून पुढच्या पिढीसाठी प्रकाशित केले. त्यापैकी ‘लोकसाहित्याचा शब्दकोष’ व ‘भाषा आणि संस्कृती’ ही दोन पुस्तके म्हणजे नवीन पिढीसाठी मार्गदर्शिकाच आहेत. लोकसाहित्याचा अभ्यास करणार्या अभ्यासकांचे अध्ययन अक्कांच्या पुस्तकाशिवाय पूर्णच होत नाही. आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये लोकसाहित्य या विषयांवर अनेक प्रकल्प हाती घेतले जात आहेत, अभ्यासक तयार होत आहेत, अनेक लोक या विषयात पीएच.डी. मिळवत आहेत. ह्या विषयाचे महत्त्व एवढ्या उंचीवर नेण्याचे श्रेय हे डॉ. सरोजिनी बाबर यांना जाते. त्यांनी मागे पडलेल्या या विषयाला नवसंजीवनी दिली. ‘लोकसाहित्याचा अभ्यास’ म्हणजे कोणत्याही साहित्य प्रकाराचा किंवा साहित्य प्रवाहाचा अभ्यास नसून तो लोकसंस्कृतीचा अभ्यास आहे, तो लोकांच्या चालीरीती, त्यांचे विचार, त्यांच्यात होणारे बदल या सर्व गोष्टींचा अभ्यास आहे व तो सतत बदलणारा विषय आहे. त्यामुळे त्यात नेहमी नवीन नवीन गोष्टींची भर पडते व सातत्याने त्यात नव्याने अभ्यास करावा लागतो, असे त्यांचे ठाम मत होते.
अक्कांच्या वडिलांनी लावलेल्या ‘समाज शिक्षण माला’ या रोपट्याचे वृक्षात रूपांतर अक्कांनी केले. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, पुराणे, संस्कृती, कला, आरोग्य, शेती.... अशा अनेक विषयांवर आधारित मासिक ‘समाज शिक्षण मला’ च्या माध्यमातून काढले जात असे. त्याचा उपयोग प्रौढ साक्षरता प्रसार, ग्रामीण समाज, शेतीप्रधान समाजाचे प्रबोधन यांच्यासाठी होत असे. त्यामुळे यात प्रकाशित होणारा मजकूर हा अतिशय साध्या, सोप्या भाषेत लिहिला जावा यावर त्यांचे विशेष लक्ष होते. अनेक तज्ज्ञांकडून यामध्ये त्या सोप्या भाषेत लिहून घेत असत.
हे सर्व झालं त्यांच्या कार्याविषयी. त्यांचे साहित्य, त्यांची लेखन शैली हा अजून वेगळा विषय आहे. त्यांची लेखन शैली ही खूप साधी, सोपी, अगदी मैत्रीणीशी मारलेल्या गप्पा वाटाव्यात अशी आहे. त्यामुळेच वाचकालाही तो विषय आपलासा वाटतो व सहज उलगडतो. अनेक जणांनी त्यांच्या या शैलीला ‘अक्का शैली’ असे नावच ठेवले होते.
अक्कांच्या कादंबर्या आणि कथा या त्या काळातील लेखिकांपेक्षा खूप वेगळ्या जाणवतात. त्यांच्या कादंबर्यांतून प्रेम, समाज जीवन, संस्कृती, समाजातील प्रश्न यांचे दर्शन घडते. तर त्यांच्या कथांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण जीवन, तेथील स्त्रियांचे आयुष्य, त्यांची सुख-दु:खे, त्यांच्या चाली-रीती असे ग्रामीण जीवनातील अनेक रंग अभिव्यक्त झालेले दिसतात.
लोकसाहित्य हाच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे लोकसाहित्यातील सहजता, जिव्हाळा, आपलेपणा, भावुकता, काव्यात्मकता, मातीशी एकरूपता हे सर्व गुणविशेष त्यांच्या लिखाणात बघायला मिळतात. असा माणुसकीचा सुगंध असणारे लिखाण खूप कमी लोकांना जमते, जे त्यांना नैसर्गिकरीत्या अवगत होते.
साने गुरुजींनंतर लोकसंस्कृतीचा वसा चालवणार्या या थोर अक्कांना आदरयुक्त प्रेमाचा प्रणाम !
पुरस्कार व सन्मान :
राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा - ‘गौरववृत्ती’ पुरस्कार.
राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’
पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठाकडून मिळालेला - ‘जीवन गौरव’ पुरस्कार.
कोल्हापूरचा - ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’.
पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार.