आकाश 1
मानवी देवतांनीच माझ जीवन समृद्ध केले आहे असे नसून मानवेतर दैवतांनाही माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आहे. सा-या सजीव-निर्जीव सृष्टीवर मी पोसलो आहे. हे वरचे निळे अनंत आकाश, हे सू्र्य-चंद्र, हे अगणित तारे, हे मेघ आणि सायंकाळचे देखावे, आणि मंगल उषा नि गंभीर निशा, पाऊस, उचंबळणारा समुद्र, वाहणारी नदी, झुळझूळ वाहणारा ओढा, हे उंच डोंगर, आणि ही क्षमामूर्ती धरित्री, हे हिरवे वृक्ष नि ही फुले, ही पाखरे, आणि ही गाय नि हे मांजर, हा बैल नि हा कुत्रा-सर्वांमुळे माझे जीवन समृद्ध झाले आहे.
निसर्ग
निसर्ग ही मानवाला मिळालेली अमोल देणगी आहे. ती त्याची प्रयोगशाळा आहे; त्याचप्रमाणे ती आनंदशाळा आहे, आरोग्यशाळा आहे. निसर्गाचा अपरंपार परिणाम आपणावर होत असतो. वरखाली अनंत लहान-मोठ्या वस्तू आपल्या सभोवती दिसत असतात. आपले लहानमोठे किरण फेकून त्या वस्तू आपल्या मनाला विकसित करीत असतात, जीवनाला समृद्ध करीत असतात.
हे अनंत आकाश
अशा या नैसर्गिक संभारात हे वरचे अनंत आकाश मनाला सर्वांहून अधिक ओढून घेते. मी तरी लहानपणापासून आकाशाचा उपासक आहे. या माझ्या उपासनेने माझ्यावर किती परिणाम झाला आहे त्याचे मी मोजमाप करू शकत नाही.
आकाशाचा सर्वात मोठा परिणाम होतो तो व्यापकतेचा. संस्कृत भाषेत आकाशाला अनेक सुंदर नावे आहेत. त्यातील अनंत हे नाव मला फार आवडे. अनंत म्हणजे ज्याला अंत ना पार. पाहावे तिकडे दूर दूर आहेच. लहानपणी वाटायचे की आकाश जवळ आहे. एख्याद्या झाडावर चढले की त्याला हात लागेल असे वाटे.
मी आईला म्हणत असे, “आई, त्या घरावर एक शिडी ठेवली, किंवा त्या आंब्याच्या झाडाला उंच कळक बांधला तर चढून आकाशाला हात नाही लावता येणार? देव ना वर राहतो? त्याचे ना ते अंगण? तेथे आपल्याला जाता नाही येणार?’’
आई म्हणायची, “ते जवळ वाटले तरी फार दूर आहे.”
मला समजत नसे. मी विचार करीत बसे.
इंग्रजीतील एका कवीतेत म्हटले आहे, “लहानपणी देव लांब नसतो. झाडांची टोके आकाशाला, स्वर्गाला टेकलेली आहेत; आणि तेथे जवळच देव असणार असे वाटते. लहानपणाची ती श्रद्धा मोठेपणी मावळते. देव दूर पळतो.”