पाणी 1
आज आपोमातेला मी शब्दांजली वाहणार आहे. वेदांमध्ये आपोदेवतेची सुंदर स्तोत्रे आहेत. खरोखरच पाण्याहून प्राणप्रिय असे दुसरे काय आहे? या पृथ्वीवर पाणी नसते तर जीवन शक्य झाले नसते. पहिला जीव पाण्यात जन्मला. त्या जीवाची उत्क्रांती होत आपण मानव पुढे जन्मलो. पाणी म्हणजे सर्व जीवनाची जननी. म्हणून पाण्याला संस्कृत कवींनी नावच जीवन दिले! संस्कृत भाषा फार सहृदय नि अतिसंपन्न. पाण्याला दिलेले एकेक नाव, योजलेला एक शब्द म्हणजे मूर्तिमंत काव्य आहे! त्या प्राचीन पूर्वजांना पाणी पाहून उचंबळून आले. या वस्तूला कोणती नावे देऊ, या वस्तूचे कसे वर्णन करु, त्यांना समजेना. त्यांची प्रतिभा भराभरा शब्द प्रसवू लागली. अमृत, पय, जीवन! एकेक पाण्याला योजलेला शब्द किती अन्वर्थक, किती गोड. ‘पाणी म्हणजे अमृत, पाणी म्हणजे दूध, पाणी म्हणजे प्राण.’ खरे आहे. पाणी नाही म्हणजे काही नाही.
बिरबलाची एक गोष्ट आहे. अकबराच्या एका नातेवाईकाने नोकरी मिळत नाही म्हणून तक्रार केली.
“म्हणजे काय? मला अडाणी मूल समजता ?”
“उद्या दरबारात या.”
“अरे तुला साधी बेरीज वजाबाकी तरी येते का?” अकबराने विचारले.
दुस-या दिवशी तो आप्त दरबरात आला. बादशहा सिंहासनावर होता. शेजारी बिरबल होता.
“सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची दहा नक्षत्रे वजा केली तर बाकी काय राहील ?”
“सतरा नक्षत्रे उरतील !”
“चूक. बिरबल, तुम्ही उत्तर द्या.”
“शून्य उरेल!”
सारे हसले. बिरबल वेडा असे सर्वांना वाटले.
“शून्य कसे?” बादशहाने विचारले.
“महाराज, पावसाची नक्षत्रे काढून टाकली तर पृथ्वीचे स्मशान होईल. खाल काय ? प्याल काय? जीवनच अशक्य होईल!”
सारे खाली माना घालून उभे राहीले.
“मी प्रश्र्न विचारला तो साध्या बेरीज-वजाबाकीचा नव्हता. तुमच्या लक्षात यायला हवे होते की, काही तरी हेतू मनात धरुन मी प्रश्न विचारला होता. बिरबलाच्या ते लक्षात आले. तुम्ही दगड आहात !”