प्रकाश 4
प्रकाशाची समता
सूर्य आपले किरण सर्वत्र नेतो. श्रीमंत असो, गरीब असो. सूर्य सर्वांना ऊब देतो. चंद्राचा प्रकाश राजवाड्यावर पडतो. झोपडीवरही पडतो. प्रकाशाचे किरण सर्व जीवनाला मिठी मारायला धावत असतात. तुमच्या हृदयातील प्रेमसूर्य सर्वांची जीवनपुष्पे विकसवण्यासाठी असो. सूर्य उगवला की बागेतील लाखो फुले फुलतात. कण्हेरी असो की गुलाब असो. सर्व कळ्याना प्रकाश फुलवतो. तुम्ही-आम्हीही सर्वांच्या जीवनकळया फुलाव्यात म्हणून धडपडले पाहिजे. नकोत भेदभाव, नकोत स्वार्थ. जीवनाचे तुकडे नका करू. सारे जीवन प्रकाशमय करू या. म्हणून श्रीज्ञानेश्र्वर भावार्थदीपिकेच्या शेवटी म्हणतातः
दुरिताचे तिमिर जावो
विश्र्व स्वधर्मसूर्य पाहो
जो जे वांछील, ते ते लाहो प्राणिजात ।
पापांचा अंधार जावो आणि धर्माचा सूर्य येवो. पाप म्हणजे अज्ञान. मी सत्य, बाकी सारे मिथ्या असे मानणे. संकुचितता म्हणजे पाप आणि धर्म म्हणजे, सर्वांची धारणा करणारे कर्म, ते पुण्य. संकुचिततेचा अंधार जाऊन, सर्वांची धारणा करणारा विचारसूर्य येवो असे ज्ञानेश्र्वर म्हणतात. म्हणजे मग कोणाला कशाची ददात राहणार नाही. हा खरा प्रकाश, प्रेमाचा प्रकाश! तो जोवर नाही तोवर अंधारच आहे.
प्रकाशाची विश्वपूजा
सूर्य तिकडे उगवतो आणि सारी सृष्टी आरती घेऊन उभी राहते! झाडे डोलत असतात. वारा गीत गात असतो. फुले सुंदर पोषाख करुन सुगंधाची आरती ओवाळतात. ते सूर्यफूल...ते तर सूर्याकडे तोंड करून असते. ज्या बाजूला सूर्य, त्याबाजूला त्याचे तोंड. आणि रात्रीचे लाखो किडे, ते पतंग!... दिवा देखताच धावून येतात. प्रकाश, प्रकश ! ते प्रकाशाला प्रदक्षिणा घालतात. या प्रकाशाला प्रदक्षिणा घालून आणि शेवटी त्याला मिठी मारुन जातात. प्रकाशाची उपासक बाळे !
उचंबळणारे रवींद्रनाथ
रवींद्रनाथ प्रकाशाचे पूजक. ते उन्हात खुर्ची टाकून बसायचे. प्रकाश पाहून नाचायचे. गीतांजलीतील एका गीतात ते म्हणतात, “प्रकाश, प्रकाश...सर्वत्र प्रकाश ! बाहेर प्रकाश, आत प्रकाश.” सारी सृष्टी त्यांना प्रकाशाने नटलेली दिसते. झाडेमाडे किरणांना डोक्यावर घेऊन नाचतात. दंवबिंदू प्रकाशात चमकतात. मौज! आनंद! असा हा प्रकाशाचा महिमा आहे! तो गावा तेवढा थोडाच. भारतीय जनता प्रकाशाची म्हणजेच प्रेमधर्माची उपासक होवो.