आकाश 5
एखादे वेळेस वाटते की, आकाश म्हणजे प्रभूचा चित्रफलक आहे. याच्यावर नाना प्रकारच्या रंगाकृती तो चितारीत असतो. ढगांचे आणि सूर्याच्या प्रकाशाचे साहाय्य घेऊन तो विश्वचित्रकार येथे अदभुत चित्रसृष्टी रचीत असतो. विशेषतः सायंकाळी त्याला वेळ असतो. सायंकालीन आकाशाची भव्यता कोण वर्णील? तेथे अनंत रंगांचे भांडार असते; क्षणाक्षणाला रंग बदलत असतात; आकार बदलत असतात. पाहून मनाला तृप्ती होत नाही, आणि तास दोन तास ही रंगलीला करून पुन्हा सारे पुसले जाते! पृथ्वीवरच्या आपल्या लेकरांसाठी का प्रभू ही चित्रशाळा उघडीत असतो? मुलांची करमणूक व्हावी म्हणून आई त्याला रंगीबेरंगी खेळणी देते. त्याच्या पाळण्यावर खेळणी टांगते. त्या विश्वमातेचाही का असाच खेळ चालू असतो? तो का चित्रकलेचे शिक्षण देत असतो ? का केवळ गंमत दाखवीत असतो ? कोणला माहीत! परंतु त्या श्रीरंगाला आपली कला दाखवायला आकाशासारखा भव्य नि निळा चित्रफलकच हवा. फळा दिसतो, वरची चित्र दिसतात, परतु चित्रकार मात्र अदृश्यच असतो !
हृदयाला आकाशाची उपमा पुष्कळ वेळा देतात. उपनिषदांत हृदयाकाश, दहराकाश असे शब्दप्रयोग येतात. तो आत्मा कोठे आहे ? खालील खोल खोल शुद्ध अशा दहराकाशात तो आहे. हृदयाला आकाशाची उपमा शोभते. आकाशात ज्याप्रमाणे ढग, धूळ, धूर, केरकचरा यांची गर्दी होते; पक्षी उडतात; त्यात कोकिळाही असतात, गिधाडे, घाण करणारी वटवाघुळे असतात, त्याप्रमाणे या हृदयाकाशातही सारी गर्दी असते! आसक्तीचे ढग, विकारांची धूळ, वासनांच गलबला सारे असते. परंतु आकाशात सर्वांच्या पलीकडे ज्याप्रमाणे स्वच्छ सूर्यनारायण असतो, त्याप्रमाणे आपल्या हृदयातही खोल खोल तो प्रेमाचा, मांगल्याचा, ज्ञानाचा सूर्य असतो. शेवटी त्याचे अंतरंगी दर्शन होऊन कृतार्थ वाटते. आकाश ज्याप्रमाणे शेवटी धुतल्याप्रमाणे निळे निर्मळ शोभते, त्याप्रमाणे आपले हृदयही धडपडीनंतर निर्मळ प्रसन्न असे होते. तेथे मग सदभावनांचे तारे चमकतात. ज्ञानाचा सूर्य तळपतो, भक्तीभावाचा चंद्र मिरवतो. हृदयाला आकाश नि समुद्र, यांच्या उपमा नेहमी देतात, एक वरचा समुद्र, एक खालचा समुद्र, आणि दोहोंशी तुलना केली जाणारा अंत:समुद्र ! आकाशाचा अंत लागणे कठीण. तेथे काय काय तरी दिसते. सारे ब्रम्हांड जणू तेथे भरलेले असते.
मला आकाशाखाली झोपणे फार आवडते. लहानपणी दारात डोके ठेवून आकाशाखाली बघत, वारा घेत मी निजायचा. मग कोणी तरी माझे अंथरूण ओढून दार लावीत. अंमळनेरला मी पुष्कळदा बाहेर मोकळ्यावर निजत असे. आकाशकडे बघत, डोळे मिटत. थंडी असली तर मी खूप पांघरूण घेतले आहे, परंतु त्या विश्र्वमाऊलीनेही आपली निळी दुलई, निळी शाल माझ्यावर घातलेली आहे. तिच्या कुशीत मी आहे, भावना ही मला सदगदित करीत असे, करते.
हे आकाश, निळ्या निळ्या नभा, अनंत अंबरा, रविशशिनक्षत्रांनी भरलेल्या गगना, तुला कोणत्या शब्दांनी संबोधू, हाका मारू ! ‘गगनं गगनाकारं’ हेच तुझे वर्णन ! तुझ्यासारखे दूसरे कोण आहे ? तुझ्याप्रमाणे निर्मळ, निःसंग, मोकळा, व्यापक असा माझा स्वभाव होत जावो. तुझ्याप्रमाणे सर्वांना जवळ घेण्याचे मला भाग्य लाभो. या जन्मी, शतजन्मी हे भाग्य वाढत जावो. तू माझा महान् गुरु, सदगुरु. तू मुकेपणाने मला अनंत शिकवलेस. तुझे उपकार किती मानू ? प्रणाम, तुला अनंत प्रणाम!