पाणी 3
पाणी असे उदार आहे समवृत्ती आहे. त्याच्याजवळ प्रेमळपणा आहे. पाणी झिरपत झिरपत पाताळापर्यंत जाऊन पोचते. पृथ्वीच्या पोटात शिरते.
जमिनीवर दगड टाकला तर तो तेथेच पडेल, परंतु पाणी आत झिरपत जाईल. तुकाराम म्हणतात-
‘ तुका म्हणे पाणी।पाताळाचे तळी खणी’ पाणी पातळ आहे; अहंकाराने टणक नाही झालेले. ते निरहंकारी आहे. म्हणून ते सर्वत्र जाते. ते जणू सर्वव्यापी आहे. दुस-यांशी एकरुप होणे हा त्याचा धर्म. त्याला स्वतःची जणू जाणीवच नाही. ते निरपेक्ष आहे. ‘पाणी तेरा रंग कैसा ? जिसमे मिलावे वैसा !’ ज्यात मला मिसळाल तसा मी. शेणात मिसळला, मी शेणखळा होईन. गुलाबात मिसळला, गुलाबपाणी बनेन. निर्मळपणा हा पाण्याचा अभिजात स्वभाव आहे. गढूळ पाणी करुन ठेवा. दोन दिशी पाहा. सारी माती खाली बसते. पुन्हा वर निर्मळ पाणी शोभते ! घाण टाकून निर्मळ होत जाणे हे पाण्यापासून शिकावे. आणि म्हणूनच पाण्याशिवाय स्वच्छता नाही. मळका कपडा, मळके अंग, पाणी घ्या नि स्वच्छ करा. रिठे, सोडा, साबण सर्व असून जर नळाला पाणी नसेल तर काय उपयोग ? स्वच्छतेचे सार्वभौम साधन म्हणजे पाणी.
पाणी तुम्हाला जीवन देते, टवटवी देते, उल्हास देते; हे तर खरेच. परंतु पाण्यातील शक्तीला अंत नाही. हे साधे पाणी, परंतु त्याच्यात अग्नी आहे. विद्युत आहे. पाण्याचा प्रचंड झोत सोडा. त्यातून बिजली निर्माण होईल. पाण्याच्या जोरावर किती तरी कामे करुन घेतात. शिवाय पाणी रोगहारक आहे. ‘डॉक्टर वॉटर !’ म्हणून एका बिषग्वराने ग्रंथ लिहीला. पाणी हाच वैद्य, हाच धन्वंतरी. वेदातील ऋषी म्हणतोः
‘अप्सु मे सोमो अब्रवीत्।अन्तर विश्र्वनि भेषजा।’ सोम मला म्हणाला, पाण्यात सर्व औषधे आहेत. ताप अधिक असेल तर कपाळावर पाण्याची पट्टी ठेवा. अजीर्ण असेल, पाणी अधिक प्या. बद्धकोष्ठ असेल, एनिमा घ्या. नासिकच्या तुरुंगात असताना माझ्या बोटाला काय झाले होते कळेना. धुळ्याला असताना उंदीर रात्री चावला की काय शंका आली. मी ओल्या पाण्याची पट्टी बोटाला बांधून ठेवत असे. शेवटी माझे बोट बरे झाले ! बंगालमध्ये काळताप म्हणून एक भयंकर ताप आहे. त्या तापात थंडगार पाणी डोळ्यांवर सारखे ओततात. ताप कमी होतो. डोळे दिवसातून तीन-चारदा धुवा; ते सतेज राहतात. स्मृतीग्रथांत म्हटले आहे, “नाक, कान, डोळे यांना पाण्याचा स्पर्श मधून मधून करावा. हुशारी वाटते.” ते अगदी खरे आहे. जुने लोक पाच-सात वेळा चूळ भरीत. त्यांचे दात स्वच्छ राहात. तोंड स्वच्छ होई. आता खानावळीतून तोंडही नीट धुता येत नाही ! नंबर लागलेले असतात. गाडी पकडायची असते. पटकन् चूळ भरुन मनुष्य जातो. मग पायोरीयादी रोग होतात. पाण्यामध्ये घाण दूर करायची, स्वच्छता निर्माण करण्याची अपार शक्ती आहे. पाण्याला अमृत म्हटले आहे. खरोखरच पाणी म्हणजे अमर रसायन आहे. वेदांतील ऋषी म्हणतोः “हे पाण्या, माझं पाप धुवून ने, मला वैभव मिळावं; महान् आनंद मिळावा; सृष्टीतील सौंदर्य दिसावं, म्हणून तुझा कल्याणकारी रस मला दे. तू आमची आई आहेस !” किती सुंदर भाव!