प्राचीन ऋषिवर 1
ही भरतभूमी अतिप्राचीन आहे, किती जुनी आहे, प्रभू जाणे. जणू ती अनादी आहे. तिचे अतिप्राचीन स्वरुप कसे होते, याविषयीही वाद आहेत. एके काळी हिमालय नसेल, मारवाडातील वाळवंट नसेल, फक्त मध्यप्रदेश कदाचित असेल. त्याच्याभोवती सात समुद्र असतील, ज्या वेळेस हिमालय नसेल त्या वेळेस गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपूत्रा या नद्या तरी कोठून असणार ? आणि कोणी म्हणतात की, आफ्रिका नि हिंदुस्थान संयुक्त होते. मध्ये हा पश्चिम समुद्र, हा हिंदी महासागर नव्हता. आफ्रिकेतील मूळच्या रहिवाश्यांच्या भाषा नि दक्षिण हिंदुस्थानी भाषा यांत काही काही समानार्थी शब्द आहेत, संशोधक सुताने स्वर्गात जातात ! खरे खोटे प्रभूला माहीत.
परंतु केव्हा तरी महान उत्पात झाले आणि आजची भरतभू निर्माण झाली. उत्तरेस प्रचंड हिमालय पावसाळी वारे अडवायला उभा राहिला. आणि उन्हाळ्यातही वितळलेल्या बर्फाचे अपरंपार पाणी पाठवू लागला. प्रचंड भूकंप झाले असावेत. समुद्र होते तेथे पर्वत उभे राहीले. समुद्र होते तेथे वाळवंटे राहिली- एक महान् त्रिकोणकृती देश उभा राहिला. एका बाजूला जगातील परमोच्च पर्वत आणि तिन्ही बाजूला धो धो करणारा सागर. आदिकवी वाल्मीकीच्या समोर असा हा अखंड भारत सदैव उभा असे. प्रभू रामचंद्रांच्या गुणांचे वर्णन करताना वाल्मीकीच्या समोर असा हा अखंड भारत सदैव उभा असे. प्रभू रामचंद्राच्या गुणांचे वर्णन करताना वाल्मीकी म्हणतातः “समुद्र इव गांभीर्य धैर्येच हिमवानिव-समुद्राप्रमाणे गंभीर नि हिमालयाप्रमाणे धैर्यवान् असा रामचंद्र होता.”
अशाप्रकारे हा अवर्णीय देश, ही भारतमाता केव्हा तरी जन्माला आली आणि नाना जाती-जमाती येथे येऊ लागल्या. येथे अगदी मूळचे काही लोक होतेच. काही पंडितांचे म्हणणे आहे की, मानवप्राणी प्रथम हिंदुस्थानात जन्मला. येथून तो सर्वत्र गेला. मधूनमधून प्रचंड उत्पात झाले असतील. पुन्हा प्रलयकाळी दूरच्या मानवजाती निवारा शोधीत इकडे आल्या असतील. एके काळी येथूनच आपण मध्य आशियाकडे गेलो होतो, हे ते विसरले असतील. पुन्हा ते नव्याने आले. ते स्वतःला आर्य म्हणत नि येथे होते त्यांना अनार्य म्हणत.