प्राचीन ऋषिवर 3
संस्कृतीचा विकास
शत्रूला हटवून आर्यांनी छोटी छोटी राज्ये निर्माण केली. प्रथम हे सारे गुरेढोरे पाळणारे होते. शेती करणारे होते. ‘आम्ही सारे विश म्हणजे वैश्य आहोत,” असे ऋषी म्हणतो परंतु स्वभावाप्रमाणे ते नाना कर्मे करु लागले. कोणी देवाची स्तुती करु लागले, पुरोहित झाले; कोणी लढू लागले ; कोणी शेतीभाती करु लागले; ज्यांना जिंकून घेतले त्यांना सर्वांचे काम करायला लावण्यात आले; असे प्रकार होऊ लागले.
संस्कृती वाढू लागली. धान्य पिकू लागले. कापूस होऊ लागला. वस्त्रे विणली जाऊ लागली. मोठमोठी खिल्लारे असत. दूधलोणी भरपूर. सोने, लोखंड सारे काही मिळू लागले. रथ असत. घोडे असत. नावा असत. हजार हजार वल्ही असलेल्या नावा ! जीवन समृद्ध होऊ लागले. नीतिनियम ठरु लागले. समाजनियम होऊ लागले.समाज जीवनाला मर्यादा घालण्यात आल्या. वैवाहिक निती जन्माला आली. भावा-बहिणींच्या नात्यांना पावित्र्य आले. द्दूत, सुरापान यांना महापातकांत गणू लागले.
“अक्षैः मा दीव्यः कृषिमित्कृषस्व- फासे नको खेळू, शेतीच कर” अशी आज्ञा ऋषी करु लागले.
नाना देव-दैवते
हे आर्य लोक उत्साही, चपळ, पराक्रमी असे होते. ते नवीन कर्मक्षेत्रे धुंडाळीत. विचाराच्या क्षेत्रातही ते उंच उड्डाणे करीत. प्रथम ही सारी सृष्टी पाहून ते भीत, घाबरत. सारे काही देव करतो, त्या त्या घडामोडींचा प्रमुख देव असावा असे त्यांना वाटे. पावसाचा देव, पाण्याचा देव, नीतीचा देव, अनेक देव. सर्वांची ते स्तुती करीत. उषादेवीला पाहून ते नाचत. उषा सदैव घवघवीत सुंदर. ती दवबिंदूंनी न्हाऊनमाखून येते. जणू ती अमृतत्वाची ध्वजाच आहे ! किती सुंदर वर्णने ! आणि सूर्य तिच्या पाठोपाठ येतो. एखाद्या सुंदर तरुणीच्या मागे मनुष्याने प्रेमाने जावे तसा हा सुर्य ! हा तेजोनारायण, हा जगाचा मित्र ! तो जणू विश्र्वाचा डोळा, सर्व स्थिरचराचा आत्मा. त्याच्याशिवाय जीवन अशक्य. आणि हा पहा प्रबळ पर्जन्य ! मुसळधार पाऊस ! वारे घो घो करीत आहेत. नद्या बेफान धावत आहेत. आकाश जणू खाली वाकले आहे. पृथ्वीला भेटत आहे. विराट विश्र्वाचा विराट प्रेम नाच ! विराट अलिंगन ! पृथ्वी आणि तिचा पती यांची प्रेममय भेट ! आणि धरणी सस्यश्याम होते ; धनधान्य प्रसवते. विश्र्वंभराची अपार लीला ! आणि हा अग्नी घरोब्याचा देव, ऊब देणारा ! संरक्षण देणारा ; तेज देणारा, पाप जाळणारा. आणि वासरांकडे धावणा-या गायीप्रमाणे भरल्या हृदयाने उचंबळून येणा-या या नद्या ! त्यांना पाहून ते ऋषी सदगदित होत. सर्व घाण वाहून नेणा-या त्या आपोदेवतांना ते म्हणतः “ इदमापः प्रवहत यत्किंच दुरितं मयि।” माझ्यातील सारे पाप धुवून न्या.” आणि आकाशातील ते अनंत तारे ? ते का आकाशव्यापी देवतेचे हजारो नेत्र आहेत ? ते का आपल्याकडे पाहात आहेत ?