प्रल्हाद 2
तो म्हणे, “मी खोटं कसं बोलू ? माझा पिता वरिष्ठ ; गरिष्ठ असं कसं म्हणू ? आपण सारी मर्त्य माणसं. मातीत मिळणारी. खरा थोर एक परमात्मा ; तो चराचराचा स्वामी, या ब्रह्मांडाचा सूत्रचालक. त्यालाच वंदावं, त्यालाच भजावं. गुरुजी, तुम्हीही वासुदेवाय नमः म्हणा. तुम्ही कशाला पाप करता ? तुम्हांला माझे बाबा खरोखर मोठे असं वाटतं का ? तुम्ही भिऊन वागता ; आणि जिथं भीती आहे तिथं कुठलं सत्य, तिथं कुठला धर्म, तिथं कुठला परमात्मा ?”
मुलांचा मेळावा
आणि प्रल्हाद या गोष्टींचा मुलांत प्रचार करी. तो त्यांना म्हणे, “माझ्या पित्याच्या नावाचा काय जयजयकार करता ? लोकांना तर त्यानं त्राही भगवान् केलं आहे. हजारोंना त्यानं तुरुंगात टाकलं आहे. लाखोंना गुलाम केलं आहे. पित्याचं नाव सोडा. प्रभूचं नाव घ्या. चराचराचा जो स्वामी, जो अनंत विश्वे निर्मितो, रवी, शरीर, तारे वर फुलवतो, त्याला भजा. त्याला वासुदेव म्हणतात. त्याला नारायण म्हणतात. भगवान विष्णू म्हणतात. त्याची आपण स्तोत्रं म्हणू. त्याचा जयजयकार करीत नाचू.” प्रल्हाद मुलांचा नायक झाला. घरोघर प्रचार होऊ लागला. लोकांच्या मनाची कोंडी झाली होता, ती मुलांनी फोडली.
नौखालीतील महात्माजींचा अनुभव
अगदी हुबेहूब असाच अनुभव नौखालीत महात्माजींना आला. कोणी घराबाहेर पडेना. महात्माजी लोकांना प्रार्थनेला बोलावीत. कोणी येईना. महात्माजींचे अनुयायी रस्त्यांतून ‘रघुपती राघव राजाराम’ म्हणत जात. स्त्री-पुरुष, मुले-बाळे घरांच्या खिडकीतून बाहेर डोकावत; परंतु त्या भजनी मंडळीत कोणी सामील होईना. मुसलमान म्हणत, “काय छाती आहे या लोकांची जाहीरपणं रामनाम म्हणण्याची. इथं अल्ला शब्द घुमेल. रामनाम बंद !” महात्माजींच्या अनुयायांना एक युक्ती सुचली. त्यांनी मुलांना खेळायला बोलावले आणि एक मुलगा आला, दुसरा आला. मुले चेंडू खेळू लागली. हसू खेळू लागली. आत्मा मुक्त झाला. दोन दिशी तिरंगी झेंडा तेथे लावण्यात आला. “या. याचं गाणं म्हणू, नि आज आपण ‘रघुपती राघव राजाराम’ म्हणत जाऊ चला.” मुले निघली. पंधरा मैल ती मिरवणूक निघाली. शेकडो मुले गर्जना करीत निघाली. मग मोठी मंडळीही बाहेर आली. स्त्रियाही आल्या. मुसलमान बघतच राहिले. “रामनाम इथं बंद” अशा गुर्मीत आपण होतो, परंतु ही मुले निर्भयपणे जयघोष करीत जात आहेत. त्या मुलांवर त्यांना हात टाकवला नाही. त्या दिवशी महात्माजींच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू आले. त्यांच्या तोंडावर आशा फुलली, आणि आल्यापासून पहिल्यांदाच ते म्हणाले, “अंधारात आज मला किरण मिळाला.” हा किरण वानरसेनेने त्यांना दिला. मुलांची शक्ती, कुमारांची शक्ती अपूर्व आहे. प्रल्हादाने असेच बाळगोपाळ गोळा केले. निर्भयतेचे वातावरण निर्माण होऊ लागले. हिरण्यकशिपू की जय याऐवजी, भगवान् वासुदेव की जय, असे घोष होऊ लागले.