प्रकाश 1
आज तेज म्हणजेच प्रकाश या महाभूताची महती मी गाणार आहे. उपनिषदातील ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना मला फार आवडते. मानवी मनाची ती हाक आहे. ‘हे प्रभो, अंधारातून मला तू प्रकाशाकडे ने !’ ह्याच्याहून अधिक सुंदर प्रार्थना जगात नसेल. सर्व धर्मांचे सार या सूत्रात आहे. पारशी धर्मात प्रकाश आणि अंधार यांचा सदैव झगडा वर्णिला आहे. अंधार पुन्हापुन्हा प्रकाशाला घेरायला येतो. परंतु शेवटी अंधार पराभूत होतो. वास्तविक अंधार म्हणजे कमी प्रकाश एवढाच अर्थ. रवींद्रानाथांनी म्हटले, चूक अशी खरोखर नसतेच. चूक म्हणजे कमी ज्ञान ! अशा चुकांतूनच ज्ञान वाढत गेले. सारे ज्ञानमय आहे, असे वेदांती म्हणतो, तेव्हा हाच अर्थ असेल. त्याप्रमाणेच सारे प्रकाशमय आहे. तुला अंधार वाटतो, त्यातही प्रकाश आहे.
गायत्री मंत्र
हिंदु धर्मात गायत्री-मंत्राला अत्यंत पवित्र स्थान दिले आहे. त्या मंत्रात प्रकाशाचीच प्रार्थना आहे. “सूर्याच्या तेजाची आम्ही प्रार्थना करतो, त्या तेजस्वी प्रकाशाचे आम्ही ध्यान करतो. आमची बुद्धी सतेज होवो,” अशी ती प्रार्थना आहे. ऋषीला प्रकाश हवा आहे. प्रकाश नसेल तर काय अर्थ ?
प्रकाशमय देवतांची प्रार्थना
जेथे जेथे प्रकाश दिसतो. तेथे तेथे आपले हात जोडले जातात. आपण सूर्याची उपासना करतो. चांद्रायणव्रत करतो. ता-याचे स्तोत्र गातो. अग्नीला भजतो. पारशी लोक अग्नी, सूर्य यांना किती मानतात ! वेदांत अग्नीचा केवढा महिमा ! सूर्य तेजस्वी खरा, परंतु तो दूर आहे. पुन्हा दिवसभर नाही. त्याचा प्रकाश चोवीस तास कसा मिळणार ? परंतु हा अग्नी ! हा तर घरोब्याचा देव. चोवीस तास, दिवसभर घरात अग्नी ठेवता येतो. आपण अग्निहोत्राचे व्रत केले. अग्नीचा एवढा महिमा का ? ज्याने अग्नीचा प्रथम शोध लावला त्याला केवढी कृतार्थता वाटली असेल! आकाशातील ते तेज धरेवर मिळाले. आपण पकडून ठेवले. घरात ते सदैव असावे असे ठरवले.
अग्नीला प्रार्थिताना म्हटले आहेः “तेजोऽसि तेजो मयी धेही-’’ “तू तेजःस्वरूप आहेस. माझ्यात तेज ठेव.” निस्तेज जीवन काय कामाचे ? मुखावर तेज असो, दृष्टीत तेज असो, वाणीत तेज असो, विचारांत... बुद्धीत तेज असो. सारे जीवन अंतर्बाह्य प्रकाशमय असो.
प्रकाशाजवळ अंधार नाही, घाण नाही. रोगजंतू प्रकाशात मरतात. शरीराचे रोग प्रकशाने बरे होतात, मनाचेही. प्रकाशात वाढ होते, विकास होतो. ज्या झाडामाडांना प्रकाश मिळत नाही ती खुरटी होतात. सावटात, छायेत पीक येत नाही. झाडाच्या फांद्या तोडतात. शेताला ऊन मिळते, प्रकाश मिळतो तेव्हा शेत पिकते.