प्रल्हाद 5
“प्रल्हाद, ऐकणार की नाही ?”
“नाही ; नम्रपणानं परंतु निर्भयपणे सांगतो... नाही !”
“तुला शिक्षा होईल.”
“मला भय नाही.”
“तुझे हाल हाल करीन.”
“मी आनंद मानीन.”
“आगीत टाकीन, तेलात टाकीन, पर्वतावरुन लोटीन.”
“प्रभूची कृपा समजेन.”
“सर्प डसवीन. हत्तीच्या पायाखाली तुडवीन.”
“प्रभूकृपा मानीन.”
पित्याचा संताप अनावर झाला. त्याने पुत्राच्या थोबाडीत दिली. प्रल्हाद शांतपणे उभा होता. पित्याने खङ्ग उपसलं. पुत्र प्रशांत होता.
जा, याचे हाल हाल करा. भगवान वासुदेवाचं नाव घेणार नाही असं कबूल करायला लावा. न्या या कार्ट्याला.”
प्रल्हादाला नेण्यात आले. आईने पुन्हा समजावून पाहिले. तो सत्याग्रही अचल होता. मातेचे हृदय शतविदीर्ण झाले.
“आई, रडू नकोस. तुझा बाळ सत्यासाठी सारं सहन करीत आहे. सोनं अग्नीत घालून बघतात. माझीही परीक्षा होवो. मी देहाचा भक्त आहे की सत्याचा, त्याची शहानिशा होवो.”