प्राचीन ऋषिवर 2
आर्यांच्या पूर्वीही काही जाती-जमाती येथे आल्या असाव्यात. सिंध प्रांतात व पंजाबच्या काही भागात जी संस्कृती उत्खननात मिळाली आहे ती कोणाची ? ती का एतद्देशीय आदिवासींची ? ते सुसंस्कृत लोक होते. त्यांनी शहरे वसवली होती. तीन-तीन मजली घरे होती. रस्त्यांची आखणी होती. विहीरी होत्या, सार्वजनिक स्नानगृहे होती. बाजारपेठा होत्या. माल साठवण्यासाठी कोठारे होती. त्यांना चित्रकला माहीत होती. दागदागिने वापरी, कपडे पेहरीत. केव्हाची ही संस्कृती? मोहोंजोदडोची ही संस्कृती अतिप्राचीन आहे. अडीच-तीन हजार वर्षापूर्वीची तरी असावी. वेदकाळ पाश्चात्य पंडीत ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षे धरतात. आणि म्हणून त्याच्या पूर्वीची हजार-दीड हजार वर्षाची, म्हणजे सुमारे चार पाच हजार वर्षांची ही मोहेंजोदडो संस्कृती असावी असे त्यांचे म्हणणे. परंतु हे गणित बरोबर नाही. भगवान पाणिनीचा काळ ख्रिस्तपूर्व आठवे शतक, असे आता सर्वमान्य झाले आहे. पाणिनीच्या पूर्वीचे यास्काचार्य. यास्काचार्यांच्या निरुक्त ग्रंथात वेदांचा अर्थ लावू पाहणा-या अनेक विद्वन्मंडळांचे उल्लेख आहेत. म्हणजे वेदांचा अर्थ त्या काळी स्पष्ट होतनासा झाला होता. यास्कांच्या पूर्वीच पुष्कळशी प्राचीन उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मणे झाली असली पाहीजेत. हा सारा वैचारीक चळवळीचा काळ कित्येक शतकांचा असला पाहीजे. आणि त्याच्या पूर्वीचे वेद. सारी सूक्ते गोळा केली गेली. त्याच्या चार संहिता झाल्या. हे सारे लक्षात घेऊन भारतीय पंडित वेदांचा काळ ख्रिस्तपूर्व तीन चार हजार वर्षे हा मानतात. काही सूक्ते तर अतिप्राचीन, सात आठ हजार वर्षांपूर्वीची असावीत. कदाचीत मध्य आशियात रचलेली ती असावीत, असे लोकमान्य म्हणत. कै. चिंतामणराव वैद्य भारतीय युद्ध ख्रिस्तपूर्व तीन हजारांच्या सुमारास झाले असे म्हणत. तेव्हा हे मोहेंजोदडोची संस्कृती या सर्वांहून प्राचीन. म्हणजे आणखी किती वर्षे मागे जावे लागेल याची कल्पना करा.
परंतु कालनिर्णय पंडीत करतील. मोघम कल्पना मला पुरे. या देशात मोहेंजोदडो संस्कृती फुलली होती. येथील मूळचे लोक सुसंस्कृत होते. त्यांना अनार्य म्हटले, एवढ्यावरुन ते रानटी होते असे नाही. येथल्या शबरासारख्या आदिवासी राजांची शहरे होती. त्यांना दरवाजे होते. अशा या आदिवासींजवळ, आलेल्या आर्यांच्या झटापटी सुरु झाल्या. जय-पराजय होत गेले. एतद्देशीय लोक मागे हटू लागले. आर्य सिंधूपासून गंगेपर्यत पसरले. काही आर्य ओरिसापर्यंत येऊन जलमार्गाने सुंदर अशा लंकेत गेले. तेथेच बलाढ्य रावण पुढे राज्य करु लागला. रावणाला राक्षस म्हटले तरी तो आर्य होता, तो यज्ञयाग करणारा होता. परंतु हिंदुस्थानातील आर्य नि लंकेतील हे आर्य एकमेकांस विसरले आणि पुढे त्यांचे लढे झाले.