ध्रुव बाळ 4
“काय झालं बाळ ? तिनं मारलं ना ? म्हटलं तुला, जाऊ नकोस-तरी गेलास. का बरं, आईच ऐकंल नाहीस ? ये, रडू नकोस.”
“आई, पित्यानं मला लोटलं. सावत्र आईनं मारलं. राजाच्या मांडीवर बसायला पुण्य लागतं, भाग्य लागतं, असं ती म्हणाली. आई, मी घरात राहणार नाही. मी जातो. पुण्य मिळवायला जातो. त्याचा मार्ग सांग, उपाय सांग. मी इथं राहणार नाही. उद्या मुलं आणखीन् अपमान करतील. अपमान म्हणजे मरण.”
“बाळ, यशाचा मार्ग एकच, सर्व वैभवाचा मार्ग एकच. त्या विश्वंभराला शरण जा. ज्यानं हे विश्व निर्मिलं, हे अनंत तारे निर्मिले, त्याची प्रार्थना कर.”
“तो कसा मिळेल ? कुठं जाऊ, कुठं पाहू ?
“तपोवनात जा. त्याचा जप करीत बस. त्याचा धावा कर. त्याला हाक मार. तुझ्या हाकेला तो ओ देईल. बाळ, परंतु तू कशाला जातोस ? इथंच राहा. मला तरी कोण ? तूच एक माझं विसाव्याचं स्थान.”
“आई, जाऊ दे.परमेश्वर तुला संभाळील. मी इथं राहणार नाही. अपमान दूर केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तुझे आशीर्वाद हे माझं बळ.”
आणि बाळ आईच्या पाया पडून निघाला. आठ वर्षे वयाला झाली नव्हती. अजून मुंजही झाली नव्हती. असा हा कोवळा वेल्हाळ बाळ जग जिंकायला नव्हे- तर जगदीश्वराला जिंकायला बाहेर पडला. श्रद्धा नि विश्वास. सरलता नि पावित्र्य यांच्या बळावर तो त्या महान् ध्येयार्थ बाहेर पडला. माता साश्रू नयनांनी पाहात होती.
आणि पित्याच्या कानांवर वार्ता गेली. राजा दुष्ट होता तरी लोकनिंदेला भीत असे. त्याने मुलाला समजावून आणायला दूत पाठवले. बाळ गेला नाही.
“तुझा पिता बोलावीत आहे.” ते म्हणाले.
“परात्पर पिता मला बोलावीत आहे, तिकडे मी जातो.” तो म्हणाला.