ध्रुव बाळ 8
“ध्रुव ध्रुवची तो खरा, प्रखर काय विश्वासची तो” अशी श्रद्धा; असा अचल विश्वास, असा मोहर्विमुक्त निश्चय कोठून आणायचा ?
मी जाऊ का रानात ?
लहानपणी आई चुलीजवळ असे. मी तिच्याजवळ असे. मी विचारायचा ; “आई मी जाऊ का ध्रुवासारखा ? मला भेटेल का देव ? तू सांग.” आई एकच म्हणे ; कुठं तो ध्रुव आणि कुठं तू रडका, हट्टी मुलगा ?” परंतु माझ्या कितीदा तरी मनात विचार येत. कधी वाटे, शेतावरच्या आंब्याच्या झाडावर बसून राहावे. जवळच्या नदीत पहाटे स्नान करावे. रात्रंदिवस ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ म्हणावे. ध्रुवाला देव सात दिवसांत भेटला. मला नाही का भेटणार ? माझे वडील येतील. मी त्यांना दिसणार नाही. ते शोधतील. आई म्हणेल, “ध्रुवाप्रमाणं वेडबंबू गेला की काय ? काय करावं या पोराला ! भारीच विचित्र !”
परंतु आई म्हणे ते खरे. कोठे तो ध्रुव आणि कोठे मी ? मी चंचल आहे. अजून शेकडो मोह आकृष्ट करतात. निश्चय ठरत नाही. ध्येय दिसत नाही. असे असले तरी या ध्रुव कथेने माझ्यावर अपार परिणाम केला आहे. ध्रुव-नारायणाची ती तसबीर मला अत्यंत आवडते. स्थिरमती ध्रुव आसनावर बसला आहे. समोर भगवान कृपाळूपणाने उभा आहे. किती तरी वेळा माझ्या मनात येते की आपण बसलो आहोत नि प्रभू मस्तकावर हात ठेवीत आहे. परंतु मनोराज्य काय कामाचे? त्यासाठी अनंत साधना हवी, ती कोठून आणू?
बाळ ध्रुवा, हे चिरंजीव भारतीय आदर्शा ! तू मला भरपूर दिले आहेस. तू हजारो वर्षे कोट्यावधी लोकांत श्रद्धा, विश्वास दिला असशील. जन्मोजन्मी तू माझा आधार राहा. दिवसेंदिवस क्षुद्रता सोडून उच्च ध्येयाकडे मला जाऊ दे. निर्दोष विकासाकडे जाऊ दे. तू आमच्या जीवनाचा ध्रुवतारा आहेस. पवित्र, नीर्मळ, अढळ, सतेज, प्रशांत आसा तू सदैव मार्गदर्शन करीत राहा. तुला भक्तिमय प्रणाम.