Get it on Google Play
Download on the App Store

हरिजन यात्रा 3

‘मला एकदा भेटली होती आई. बाबा, ती खरेच का हो माझी आई? आणि माझे बाबा कोठे आहेत? तुम्ही आजोबा; परंतु मी आपली तुम्हालाच बाबा म्हणत्ये, माझी आई, माझे बाबा मला भेटतील?’

‘आई तर भेटेल. मग पुढे पाहू.!’

रामराव व सरोजा पुन्हा मुंबईस आली. त्या वकिलाच्या पत्त्यावर उभयता गेली. रामरावांनी आपली सर्व हकीगत सांगितली. प्रेमाच्या लग्नाच्या वेळचा एक फोटो होता. त्यांच्याजवळ एक प्रत होती. प्रेमाचाही एक फोटो होता. त्यांनी सर्व फोटो दाखविले. होय, हीच सरोजा. हेच रामराव.

तो बंगला, ती इस्टेट सरोजाला मिळाली.

त्या बंगल्यात रामराव राहायला आले. माळ्याने बंगला उघडला. दिवाणखान्यात दोघे आली.

‘हाच, हाच बंगला. तेथेच आई होती. कोठे आहे आई? येथे माझी तिने वेणी घातलीन्. येथे खाऊ दिलान् तिने. कोठे आहे आई?

‘आई तुरुंगात आहे बाळ.’

‘आणि माझे बाबा?’

‘तेही तुरुंगात.’

‘मग आपणही जाऊ तुरुंगात. सारी एकत्र राहू. येता? लहान लहान मुलेसुद्धा जातात. मी भिणार नाही.’

‘सरोजा, लवकरच ते सुटतील आणि तू मला आता आजोबा हाक मारत जा, समजलीस?’

‘होय आजोबा. न पाहिलेले माझे बाबा येणार म्हणून ना?’

‘हो.’

एके दिवशी सरोजा व रामराव प्रेमाच्या भेटीस निघाली. तुरुंगात भेट झाली.

‘प्रेमा, बरी आहेस ना?’ रामरावांनी विचारले.

‘तुमच्या आशीर्वादाने सारे गोड होत आहे. आत्याची हकीगत कळली ना?’

‘वकिलांनी सांगितली. तू सुटलीस म्हणजे आणखी सांगशील. सरोजा, जा ना आईजवळ. प्रेमा, आई केव्हा येईल असे सारखे ही म्हणत असते.’

बेबी सरोजा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
रामराव 1 रामराव 2 रामराव 3 सत्यनारायण 1 सत्यनारायण 2 सत्यनारायण 3 सत्यनारायण 4 प्रेमाचे लग्न 1 प्रेमाचे लग्न 2 प्रेमाचे लग्न 3 प्रेमाचे लग्न 4 पित्याची शेवटची देणगी 1 पित्याची शेवटची देणगी 2 पित्याची शेवटची देणगी 3 पित्याची शेवटची देणगी 4 ना सासर ना माहेर 1 ना सासर ना माहेर 2 ना सासर ना माहेर 3 ना सासर ना माहेर 4 मुलीचा त्याग 1 मुलीचा त्याग 2 आत्याच्या घरी 1 आत्याच्या घरी 2 आत्याच्या घरी 3 आत्याच्या घरी 4 आत्याचे निधन 1 आत्याचे निधन 2 आत्याचे निधन 3 आत्याचे निधन 4 मुलीची आकस्मिक भेट 1 मुलीची आकस्मिक भेट 2 मुलीची आकस्मिक भेट 3 पतीच्या मदतीस 1 पतीच्या मदतीस 2 पतीच्या मदतीस 3 पतीच्या मदतीस 4 सत्याग्रहात 1 सत्याग्रहात 2 सत्याग्रहात 3 सत्याग्रहात 4 हरिजन यात्रा 1 हरिजन यात्रा 2 हरिजन यात्रा 3 हरिजन यात्रा 4 आनंदी आनंद गडे 1