पतीच्या मदतीस 1
प्रेमा दु:खाने दिवस काढीत होती. आशा-निराशांवर तिची हृदयनौका नाचत होती. अशा सुमारासच ती ३० सालची सत्याग्रहाची प्रचंड चळवळ सुरू होणार होती. महात्माजींची दांडी-यात्रा सुरू झाली होती. ती स्फूर्तिदायक महान् यात्रा पाहावयास प्रेमाही गेली.
ती परत आली; परंतु शांत गंभीर होऊन आली. या चळवळीत पहावे असे तिला वाटले. मुंबईत हजारो स्त्रियांच्या मिरवणुकी निघत होत्या. समुद्राचे बेकायदा पाणी आणीत होत्या. मुलींना शिक्षा होत होत्या. प्रेमालाही भारताचा लढा ओढू पाहात होता.
परंतु पैशाचे काय करावे? बंगला जप्त झाला तर? शेअर्स जप्त झाले तर? झाले तर झाले. स्वातंत्र्यापुढे या दिडक्यांची काय मातब्बरी? पै पैशांत ज्याचा जीव अडकला, त्याला महान ध्येये कशी भेटणार?
सारे सरोजाच्या नावाने करून ठेवावे का? बाबा ट्रस्टी होतील. का ही संपत्ती खादीच्या कामास देऊ? काय करू?
प्रेमाचे काही ठरत नव्हते. इतक्यात एके दिवशी वर्तमानपत्रात तिने काहीतरी वाचले. तिने ती बातमी पुन्हा वाचली. तिचे डोके सुन्न झाले. ती विचार करीत अंथरुणावर पडली.
कसली होती ती बातमी?
तिच्या श्रीधरवर अफरातफरीच्या गुन्ह्याखाली, खोट्या सह्या वगैरे करून फसवण्याच्या गुन्ह्याखाली खटला भरण्यात आला होता. तो पोलिसांच्या ताब्यात होता.
‘श्रीधर! काय त्याचा नि माझा आता संबंध? ज्याने मला ढोराप्रमाणे वागवले, त्याच्याशी काय माझे नाते? ज्याने माझी पै किंमत केली, त्याच्यासाठी मी काय म्हणून रडावे? परंतु श्रीधर कसाही असला तरी माझ्या सरोजाचा तो पिता आहे. सरोजाचे सुख त्याने मला दिले आहे. श्रीधरला वाचवले पाहिजे. कसाही असला तरी त्याचा माझा संबंध आहे. त्याच्या संकटकाळी धावून जाणे माझे काम आहे.’