सत्याग्रहात 3
श्रीधर निघून गेला. तो आता आज समुद्रवर जाऊन बसला. एकटाच बसला. किती तरी वेळ तो विचार करीत होता. का यावे प्रेमाने माझ्याकडे? माझ्याजवळ काय आहे? पावित्र्य नाही पराक्रम नाही, पैसा नाही प्रेम नाही. काय आहे मजजवळ? कायद्याने मला ताबा मिळाला तरी तिच्या मनावर मला ताबा मिळेल का? प्रेमाचा कायदा हाच खरा. बाह्य कायद्यांची बाह्य सत्ता. खरी सत्ता प्रेमाची आहे. मला प्रेमावर खरी मालकी मिळवायची असेल तर तिच्यावर मी प्रेम केले पाहिजे. करता येईल का प्रेम? निदान माणुसकीने राहाता येईल का? माझे छंद सुटतील का? का मीही तुरुंगात जावे? सत्याग्रही म्हणून जाऊ का? देशभक्तीच्या गंगेत जरा डुंबू का? मागील पाप त्याने नाही का धुतले जाणार? असे विचार तो करीत होता.
समोर समुद्र उचंबळत होता. फार गर्दी नाही आता. श्रीधरला तेथून उठावेसे वाटेना. अशाच विचारसिंधूत डुंबत राहावे असे त्याला वाटले.
सत्याग्रहात जाण्याचा निश्चय करून तोही उठला. मुंबईत कोणता तरी दिन साजरा व्हायचा होता. श्रीधरने त्यात भाग घेतला. त्याल शिक्षा झाली. विसापूरच्या तुरुंगात त्याची रवानगी झाली.
तुरुंगात शेकडो ठिकाणचे राजकीय कैदी होते. श्रीधर त्यांच्यात रमू लागला. नवीन नवीन पुस्तके वाचू लागला. चर्चा, प्रवचने ऐकू लागला. कविता, पोवाडे ऐकू लागला. त्याच्या जीवनाचे नवीनच दालन जणू उघडले. श्रीधरला आनंद वाटू लागला.
तुरुंगातून सुटल्यावर आपण प्रेमाचे पाय धरू, तिची क्षमा मागू; काही तरी समाजसेवा करू, असे मनात तो योजू लागला. दिवसेंदिवस तो विचारी दिसू लागला. त्याच्या चर्येवर मधून मधून मंगल आनंदही दिसे.
प्रेमाही त्या स्वातंत्र्यमंदिरात विचार करीत होती. ‘आपण आपल्या हालअपेष्टांनी इंग्रजांचा हृदयपालट करायला निघालो; मग माझ्या पतीचा हृदयपालट व्हावा म्हणून मी का धडपडू नये? ते नाहीच का सुधारणार? त्यांना घरी घेऊन यावे. पुन्हा प्रयत्न करून पाहावा. त्या दिवशीच मी जरा नीट बोलल्ये असते तर? ज्या दिवशी श्रीधरची निर्दोष सुटका झाली, त्या दिवशी त्याला मोटारीत घालून आणले असते तर? तो क्षण होता. तो क्रान्तीचा क्षण होता. मी तो क्षण घालविला. राष्ट्राच्या काय किंवा व्यक्तीच्या जीवनात काय, क्रान्तीचे क्षण केव्हा येतात, तेव्हाच त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. ती वेळ गेली, तो क्षण
गेला की, मागून काही उपयोग होत नाही आणि असा क्षण पुन्हा यायला कितीतरी काळ लागतो.’
प्रेमाने मनाशी काही तरी ठरविले. सुटल्यावर श्रीधरचा पत्ता काढून त्याला घरी आणण्याचे, पुन्हा संसार सुरू करण्याचे ठरविले.
श्रीधर व प्रेमा दूरदूरच्या तुरुंगात होती; परंतु मनाने एकमेकांच्या जवळ येत होती. श्रीधर तुरुंगात होता हे प्रेमाला माहीतच नव्हते.