Get it on Google Play
Download on the App Store

मुलीचा त्याग 2

पित्याने सरोजाला उचललेले पाहून प्रेमाचा जीव खाली पडला. ती तेथून तडक निघून गेली. कोठे गेली? ती हिंडत हिंडत दादर माटूंगा भागाकडे गेली. तेथे तिने एक अनाथ हिंदू महिलाश्रम पाहिला. ती तेथे गेली. तिची विचारपूस करण्यात आली. तिला तेथे आश्रय मिळाला.

आणि रामराव कोठे गेले? ते कोठे राहात असत? मुंबईतील अस्पृश्यांची वस्ती ज्या भागात होती, त्या भागात ते राहात होते. त्यांच्या गावचे काही महार तेथे होते. त्यांच्या आधारानेच ते तेथे राहिले. तेथे त्यांनी सेवा आरंभिली. ते रात्रीची शाळा चालवीत. प्रौढ अस्पृश्य बंधूंना ते शिकवीत. त्यांना वाचून दाखवीत. त्या ठिकाणी थाडी पडीत अशी जागा होती. रामरावांनी तेथे फुले लावली. ती पडीत जागा आता सुंदर झाली. कामगार तेथे रात्रीच्या वेळेस बसत. रामराव तेथील फुले विकीत. दोन दिडक्या मिळवीत. ते तेथे सर्वांना प्रिय झाले. तेथील मंडळी त्यांना रामबोवा असे म्हणत.

कधी कधी मंडळी भजन करीत. रामबोवा भजन सांगायचे. मंडळी रंगून जायची. पुढे पुढे तर कामावर जाणारी मंडळी कधी कधी आपली मुलेही रामरावांच्या स्वाधीन करीत. रामराव त्या मुलांना सांभाळीत.

रामराव पहाटे उठत. समुद्रावर फिरायला जात. फिरून आल्यावर ते फुलझाडांना पाणी घालीत. मग वर्तमानपत्रे वाचायला वाचनालयात जात. दुपारी जेवत. विश्रांती घेत. तिस-या प्रहरी पुन्हा पाणी वगैरे घालीत. सायंकाळी फिरून येत. रात्री वर्ग घेत.

त्यांची एक लहानशी खोली होती. त्या खोलीत प्रेमाचा एक फोटो होता. त्या खोलीत ते बेबी सरोजाला घेऊन आले. आजूबाजूची माणसे चौकशी करू लागली.

‘रामाबोवा, मूल कोठून आणलेत?’

‘समुद्राने दिले. मी समुद्रकाठी बसलो होतो. डोळे मिटून बसलो होतो. डोळे उघडले तर ही मुलगी. गोरी गोमटी मुलगी. देवाने दिली. मी बागेत फुले फुलवितो. देवाने ही कळी फुलवायला पाठविली. पाहा कशी हसते! तिचे नाव मी सरोजा ठेवले आहे. आवडते ना ग तुला हे नाव?’

ती मुलगी हसली. रामरावांच्या गळ्यात तिने चिमण्या हातांनी मिठी मारली.

रामरावांना आता हा मोठाच उद्योग झाला. सरोजाचे ते सारे करीत. तिच्यासाठी पाणी तापवीत. तिला न्हाऊ घालीत. तिला दूध पाजीत. पुढे तिचे त्यांनी उष्टावण केले. तिला त्यांनी लहानशी गरम बंडी केली. सरोजा आजोबांच्याजवळ वाढू लागली. त्यांच्या कुशीत निजू लागली. बागेतील फुले आणून तिच्या केसांत ते गुंफीत.

किती सुरेख दिसे मग बेबी सरोजा!

बेबी सरोजा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
रामराव 1 रामराव 2 रामराव 3 सत्यनारायण 1 सत्यनारायण 2 सत्यनारायण 3 सत्यनारायण 4 प्रेमाचे लग्न 1 प्रेमाचे लग्न 2 प्रेमाचे लग्न 3 प्रेमाचे लग्न 4 पित्याची शेवटची देणगी 1 पित्याची शेवटची देणगी 2 पित्याची शेवटची देणगी 3 पित्याची शेवटची देणगी 4 ना सासर ना माहेर 1 ना सासर ना माहेर 2 ना सासर ना माहेर 3 ना सासर ना माहेर 4 मुलीचा त्याग 1 मुलीचा त्याग 2 आत्याच्या घरी 1 आत्याच्या घरी 2 आत्याच्या घरी 3 आत्याच्या घरी 4 आत्याचे निधन 1 आत्याचे निधन 2 आत्याचे निधन 3 आत्याचे निधन 4 मुलीची आकस्मिक भेट 1 मुलीची आकस्मिक भेट 2 मुलीची आकस्मिक भेट 3 पतीच्या मदतीस 1 पतीच्या मदतीस 2 पतीच्या मदतीस 3 पतीच्या मदतीस 4 सत्याग्रहात 1 सत्याग्रहात 2 सत्याग्रहात 3 सत्याग्रहात 4 हरिजन यात्रा 1 हरिजन यात्रा 2 हरिजन यात्रा 3 हरिजन यात्रा 4 आनंदी आनंद गडे 1