सत्यनारायण 1
महारवाड्यात विठनाक म्हणून एक महार होता. त्याचा मिलगा येसनाक पलटणीत होता. तो रजेवर आला. मुलगा घरी आला म्हणून विठनाकाला फार आनंद झाला होता. महारवाड्यातील लहान थोर मंडळी येसनाकाला भेटायला येत होती.
विठनाकाने सत्यनारायण करायचे ठरविले. पांडूभटजी येऊन प्रसाद करणार होते. विठनाकाने अंगणात पूजेची तयारी केली. येसनाक पूजा करणार होता, हजार तुळशीपत्रे वाहाणार होता. सारा महारवाडा येणार होता.
परंतु तिस-या प्रहरी आकाश भरून आले. अपरंपार पाऊस येणार असे वाटले. आता पूजा कशी होणार? अंगणात पाणी पाणी होईल. लोक कोठे बसणार, भजन कोठे करणार? सारीच पंटाईत.
‘बाबा, रामरावांच्या घरी आपण जागा मागू. केवढे थोरले घर आहे. अका पडवीत पूजा मांडू, तेथे भजन करू.’ येसनाक म्हणाला.
‘नाही रे बाबा. सारे बामण धावून येतील.’
‘येऊ देत धावून. मी रामरावांना विचारून तर पाहातो.’
‘पोरा, असे अकृत करू नको. तू जाशील पलटणीत निघून, परंतु आम्हाला येथेच दिवस काढायचे.’
‘बाबा, असे मागे मागे राहून कसे चालेल? आपण धिटाईने पुढे आले पाहिजे. आम्ही अस्पृश्य नाही असे पुकारले पाहिजे. आपणच स्वत:ला अस्पृश्य का म्हणावे? इंग्रज हिंदी लोकांना नालायक म्हणतात, म्हणून का हिंदी लोकांनीही स्वत:ला नालायक समजावे? तसेच हे.’