सत्याग्रहात 1
एके दिवशी प्रेमा समुद्रावर फिरायला गेली होती. तिची मोटार रस्त्यावर उभी होती. एका बाकावर ती बसली होती. बराच वेळ झाला. गर्दी कमी झाली.
तो प्रेमाला एकाएकी कोण दिसले? तिच्याकडे एक गृहस्थ टक लावून सारखे पाहात होता. कोण तो गृहस्थ? प्रेमा एकदम उठली. तसा तो गृहस्थ जवळ आला. प्रेमा जाऊ लागली. त्याने अडविले.
‘प्रेमा, जाऊ नकोस.’
‘मला तुमच्याजवळ बोलायचे नाही.’
‘तिला बोललेच पाहिजे. मी तुला जाऊ देणार नाही.’
‘मी पोलिसांस हाक मारीन.’
‘मी तुझा पती आहे. पोलीस मला काहीएक करू शकणार नाहीत. तुझ्याच अब्रूचे धिंडवडे होतील. खाली बस.’
प्रेमा बाकावर बसली. श्रीधरही बसला. कोणी बोलेना.
‘प्रेमा, माझ्या खटल्यात कोणी मदत केली?’
‘मी केली.’
‘कोठून आणलेस पैसे?’
‘आणले कोठून तरी.’
‘नवरा तुरुंगात पडल्यावर पैसे घेऊन आलीस, परंतु आधी येतीस तर मी तुरुंगात आलोही नसतो. तू इकडे चैन करीत आहेस आणि नव-याला भीक मागायला लावले आहेस. तू मोटारी उडवतेस. बंगल्यात राहातेस. सारे मला समजले आहे. तुझ्या बंगल्यात मी राहायला येणार.’
‘आलेत तर मी जीव देईन.’
‘दे जीव. बंगला तरी मला मिळेल.’