पतीच्या मदतीस 2
मनात असा विचार करून ती आत्याच्या ओळखीच्या वकिलाकडे गेली. त्याच्याजवळ तिने बोलणे केले. जामिनावर सोडवून घेऊ नये असे ठरले; परंतु तुरुंगात त्याला घरचे जेवणखाण मिळेल अशी व्यवस्था करण्याचे ठरले. कपडेलत्ते, अंथरूणपांघरूण, वाचायला पुस्तके, वगैरे सारे त्याला मिळेल असे करण्याचे ठरले. वकील खटला चालवणार होते. श्रीधरला भेटणार होते.
प्रेमा रोज वकिलांकडे जाई व सारी हकीगत विचारी. श्रीधरची मन:स्थिती उदास होती. आईबापांनी त्याला हाकलून दिले होते. त्याचा आमचा काही संबंध नाही असे जाहीर केले होते. त्या मडमिणीनेच त्याचा गळा कापला होता. श्रीधरला फशी पाडून ती कोठे परागंदा झाली होती.
बिचारा श्रीधर!
त्याला आता कोणी नव्हते. सारे गतजीवन त्याच्या डोळ्यांसमोर उभे राही. तो रडेही; परंतु पुन्हा डोळे पुशी. अश्रूंची त्याला लाज वाटे.
वकील त्या सा-या हकीगती प्रेमाला सांगत. तिच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती उत्पन्न होई. एके दिवशी श्रीधरने वकिलांस विचारले,
‘वकीलसाहेब, माझ्यासाठी कोण ही सारी खटपट करीत आहे? मी कोणावर कधी उपकार केला नाही. कोणावर खरे प्रेम केले नाही. कोणाला साहाय्य केले नाही. संकटकाळी माझ्यासाठी देवाने यावे, उभे राहावे, असे मी काय केले आहे?’
‘तुमच्या आप्तेष्टांची पुण्याई असेल.’
‘आप्तेष्टांनी मला हाकलून दिले आहे.’