आत्याच्या घरी 1
दवाखान्यात त्या श्रीमंत बाईला प्रेमाशिवाय चैन पडत नसे. प्रेमाची पाळी नसली तरीही ती तिच्यासाठी येई आणि ती श्रीमंत बाई मग आफ्रिकेतील गोष्टी सांगे.
‘एकदा की नाही, आम्ही मोटारीतून जात होतो. फार मोठा घाट होता. तेथून मोटार फार हळूहळू न्यावी लागत असे. आजुबाजूस किर्र, अगदी दाट जंगल. रात्रीची वेळ होती आणि सिंहाच्या गर्जना कानांवर आल्या. मला भीती वाटली. आला सिंह व त्याने उडा मारली तर? असे सारखे मनात येई. कशी गर्जना! अंगावर काटा उभा राही. शेवटी एकदाचे आम्ही घरी आलो. जणू मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडलो. नंतर दोन दिवस मी अंथरुणात पडू होत्ये. इतका त्या भीतीचा परिणाम झाला होता आणि एकदा त्यांच्यावर कोण कठीण प्रसंग! केवढा मोठा सर्प! समोर आपला फणा करून उभा. हे तेथे उभे व समोर साप उभा. यांना हलता येईना, पळता येईना. हातात साधन नाही. साप यांच्याकडे बघत होता; हे सापाकडे बघत होते. फणा डोलवीत होता; पण थोड्या वेळाने साप फण् करून निघून गेला आणि हे धाड्कन पडले. अजून हे आले का नाहीत म्हणून मी पाहायला गेल्ये. तो हे पडलेले. मी त्यांना घरी आणले. ते मग शुद्धीवर आले. मरणाच्या घरून जणू आले. मरणासमोर सारखे उभे होते. केवढा मनावर ताण. असे हे प्रसंग.’
‘जाऊ दे मला.’
‘तुम्हाला सारखे काम हवे.’
‘नको का करायला? मला आवडतेही. मी येथला पगारही घेते.’
‘मी बरी झाल्ये की, तुम्हाला माझ्याकडे नेईन. मी घरी एकटी. माझ्याकडे राहा माझी नर्स म्हणून. मला रोज उठून काही तरी होतच असते. जवळ कोण तरी असले म्हणजे बरे. प्रेमाचे कोण आहे मला? तुमचा स्वभाव प्रेमळ आहे. माणुसकी आहे तुम्हाला. याल का माझ्या बंगल्यात राहायला? मी भरपूर पगार देईन. तुम्ही पैशाच्या भुकेलेल्या नाही हे मी समजते; परंतु पाहा विचार करून.’
‘बरे बघू.’ असे म्हणून प्रेमा निघून गेली. पुढे काही दिवसांनी ती श्रीमंत बाई आपल्या बंगल्यात परत गेली; परंतु प्रेमाला ती विसरली नाही. एकदा मोटार घेऊन ती प्रेमाला न्यायला आली. ‘चलाच माझ्याकडे. फराळाला तरी चला.’ असा आग्रह करू लागली.