प्रेमाचे लग्न 3
‘तुमच्या प्रेमावर माझे प्रेम आहे. आमचा विवाह होऊ दे. तुमचा बहिष्कार उठू दे. तुम्हाला सुख व आम्हाला सुख.’
‘परंतु प्रेमाचे काय?’
‘ती आमच्याकडे खेळायला येत असे. तिचेही माझ्यावर प्रेम असेल आणि नसेल तर पुढे बसेल. बायकांचे शेवटी ज्यांच्याशी लग्न लागते त्यांवर प्रेम जडते. पाहा बोवा, बाबांच्या संमतीने मी आलो आहे.’ असे म्हणून तात्या गेला.
तो गेल्यावर सगुणाबाई म्हणाल्या, ‘किती धीट तरी हा तात्या.’
रामराव घरी परत आले. ते थकले होते. कोठे काही जमले नव्हते. सगुणाबाईंनी तो तात्याचा उपाय सांगितला. रामराव चिडले. संतापले. तात्याच्या कानांवर त्या वार्ता गेल्या. शंभुनाना व तात्या ह्यांनीही प्रेमाचे लग्न नाहीच कोठे ठरू द्यायचे अशी प्रतिज्ञा केली. त्यांचे विषप्रसारक दूत सर्वत्र हिंडत असत.
रामरावांनी आता दूर दूर जायचे ठरविले. सगुणाबाई व प्रेमा ह्यांना घेऊन ते एके दिवशी रात्री गुपचूप घराबाहेर पडले. ते मुंबईस आले. तेथून नागपूरला आले. प्रेमा व सगुणाबाई ह्यांना तेथे एके ठिकाणी ठेवून ते इंदूर, उज्जयिनी, महू, दिल्ली सर्वत्र संचार करीत गेले.
एके ठिकाणी एक स्थळ मिळाले. तो एका मोठ्या अंमलदाराचा मुलगा होता. मुलालाही लवकरच मोठी नोकरी मिळायची होती. साहेबलोकांत पितापुत्रांची जानपछान होती.
‘मग आमची प्रेमा तुम्हाला पसंत आहे ना? फोटो तर पाहिलातच!’ रामरावांनी विचारले.
‘परंतु हुंड्याचे कुठे ठरले?’ सदानंदपंत म्हणाले.
‘किती पाहिजे हुंडा?’
‘पाच हजार तरी हवा.’
‘हे पाहा, मी पाच हजार हुंडा देतो. परंतु पुन्हा मात्र माझ्याजवळ काही मागू नका. घरदार सारे विकून मी पाच हजारांची भरपाई करतो.’
‘ठीक तर. ठरवून टाकू या.’