प्रेमाचे लग्न 1
‘काहीतरी करून पोरीचे एकदा लग्न लावा. ती एकदा सासरी गेली म्हणजे हे डोळे मिटीन. घरांतून बाहेर पडता येत नाही. कोणीकडे जाता येत नाही. तुमचा मानी स्वभाव आडवा येतो. माफी मागा व मोकळे व्हा. परंतु ते नाही.’
‘अग, आपली काही चूक असेल तर ना माफी मागायची? पातक्यांची माफी मागणे म्हणजे सर्वांत मोठे पाप. मेलो तरी मी माफी मागणार नाही.’
‘परंतु प्रेमाचे कल्याण व्हावे असे नाही का तुम्हाला वाटत? तुम्ही आम्ही जाऊ; परंतु तिला जगात जगायचे आहे.’
‘मी तिच्यासाठी खटपट का करीत नाही? सतरा ठिकाणी धोंडे मारून पाहात आहे. कोठेतरी धोंडा लागेल. मी सांगू का, ह्या शेवटी नेमानेमाच्या गोष्टी असतात; परंतु प्रयत्न करू नये असे नाही. जेथे जेथे मी जातो, तेथे तेथे हे सनातनी गुंड मोडा घालतात. लग्न मोडणे ह्यासारखे पाप नाही...’
इतक्यात प्रेमा आली.
‘बाबा, तुम्ही सचिंत का? आई, तू का अशी?’
‘तुझ्यासाठी चिंता.’ सगुणाबाई म्हणाल्या.
‘माझी चिंता देवाला आहे. सत्यनारायणाला आहे. बाबा माझ्या लग्नाची एवढी का यातायात? नाही झाले लग्न म्हणून काय बिघडले?’
‘प्रेमा, तू लग्न केलेच पाहिजेस. तू लग्न करणार नसशील तर मी जीव देईन अब्रूचे धिंडवडे चालले आहेत तेवढे पुरेत तुम्ही मुली लग्न नको नको म्हणता व उद्या दुस-याच गोष्टी कानावर येतात. ते काही नाही, तू लग्न करणार की नाही बोल. आता सांग.’
‘आई, माझ्यावरचा तुझा विश्वास का अजिबात गेला?’