मुलीची आकस्मिक भेट 1
आत्या देवाघरी गेली. आत्या अकस्मात् भेटली. त्याप्रमाणे सर्वांची अकस्मात् भेट व्हायची आहे की काय? असा विचार प्रेमाच्या मनात येई. या विचाराने तिला आशा येई. उत्साह वाटे.
ती मोटारीतून मुंबईभर हिंडे. बाबा कोठेतरी दिसतील, भेटतील असे तिला वाटे; परंतु तिची आशा अद्याप पूर्ण झाली नव्हती.
कंटाळून ती मुंबई सोडून गेली. हिंदुस्थानभर प्रवास करून आली. मोठमोठ्या शहरांतून राहिली; परंतु कोठेही गेली तरी सरोजा तिच्या डोळ्यांसमोर असे. काशीला तर गंमतच झाली. घाटावर प्रेमा स्नानासाठी गेली होती. तो तेथे तिला एक मुलगी दिसली.
‘सरोजा. माझी सरोजा.’ प्रेमा म्हणाली आणि त्या मुलीचे नावही सरोजाच होते.
‘माझीच ना ग तू? तुझ्या एवढीच ती असेल. सरोजा.’ प्रेमा त्या मुलीला जवळ घेऊन म्हणाली.
त्या मुलीची आई जवळच होती. ती आली.
‘ही तुमची सरोजा वाटते? मग माझी कोठे आहे? द्या. तुमची सरोजा जरा माझ्याजवळ द्या. ये ग सरोजा. तुझी वेणी घालत्ये. ये.’ आणि खरेच प्रेमाने त्या अनोळखी सरोजाची वेणी घातली. तिला खाऊसाठी पाच रुपये दिले.
किती तरी दिवसांनी प्रेमा पुन्हा मुंबईस आली होती. माळ्याने बंगला सांभाळला होता.
एके दिवशी सायंकाळी एक लहान मुलगी फुलांचे हार, गजरे विकीत रस्त्यातून जात होती. फुलांची गाणी गात ती जात होती. गोड सुंदर मुलगी. तिचा गोड आवाज. हातांत फुलांचे गोड गजरे. फुलांच्या गोड माळा. सुंदर व प्रसन्न होते ते दृश्य!
प्रेमाने गॅलरीतून खाली पाहिले.
‘ए मुली, वर ये.’ तिने हाक मारली.
ती लहान मुलगी धावत वर आली.
‘तुम्हाला पाहिजेत हे गजरे, हे हार?’
‘हो. ये बस.’
‘बसत नाही मी. मला लवकर जायचे आहे.’
‘कोठे जायचे आहे?’