आत्याचे निधन 1
प्रेमाला आता काही कमी नव्हते, पण समुद्रात असूनही ज्याप्रमाणे तहान भागवता येत नाही, त्याप्रमाणे वैभवात असूनही तिला समाधान नव्हते. आत्याजवळ ती बसे. वरवर हसे. सिनेमा नाटकाला जाई; परंतु मन विषण्णच असे.
आत्याने तिला मोत्यांचा कंठा आणला. मोठमोठ्या मोत्यांची कुडी आणली. नेसायला मोलवान रेशमी पातळे. प्रेमा आता राणीसारखी दिसे; परंतु राणीप्रमाणे असूनही ती केविलवाणी होती. आत्या जवळ नसली म्हणजे तिचे डोळे भरून आल्याशिवाय राहात नसत.
‘प्रेमा, आपण यात्रेला जायचे? येऊ निरनिराळी तीर्थे पाहून. निरनिराळी शहरे पाहून. येतेस? तुलाही विरंगुळा होईल. माझेही दिवस सार्थकी लागतील.’
‘आत्या, माझी आई बाबांना नेहमी म्हणायची की, यात्रेला चला. बाबा म्हणायचे, प्रेमाचे लग्न झाले म्हणजे जाऊ; परंतु आईची इच्छा पूर्ण झआली नाही. ती देवाकडे गेली.’
‘आईची इच्छा आता तू पुरी कर.’
‘आत्या, खरोखर माझे लक्ष कशात लागत नाही. तुला एक गोष्ट सांगू? अद्याप तुझ्याजवळून ती गोष्ट मी लपवून ठेवली आहे. सांगू? आत्या, मला एक मुलगी आहे. सोन्यासारखी मुलगी.’
‘कोठे आहे ती? मूलबाळ झाल्यावरसुद्धा का नव-याने तुला हाकलून दिले.’
‘मला वाटले होते की, माझे बाळ आमचे संबंध प्रेमाचे करील; परंतु नव्हते नशीब.’
‘ती मुलगी कोठे आहे?’
‘’समुद्रकाठी एके दिवशी माझे बाळ मी तेथे वाळवंटात ठेवून दिले.’
‘असे कसे केलेस? लाटांबरोबर गेले असेल. अरेरे, असे कसे केलेस?’