दृष्टीकोन
एका सुनसान (निर्जन) रस्त्यावरून फिरत असताना मुल्लाने घोड्यावर बसलेल्या काही लोकांना आपल्या दिशेने येताना पाहिले. त्याचे डोके काम देऊ लागले. त्याने स्वतः लुटारुंच्या ताब्यात सापडल्याची कल्पना केली जे त्याचा जीव घेणार होते. त्याच्या मनात स्वतःला वाचवण्याची खळबळ उडाली आणि तो सरपटत पळत रस्त्यावरून खाली उतरून भिंत चढून कब्रस्तानात घुसला आणि एका उघड्या कबरीत जाऊन झोपला.
घोडेस्वारांनी त्याला पळत असे करताना पाहिले. कुतूहलाने ते त्याच्या मागे गेले. प्रत्यक्षात ते घोडेस्वार म्हणजे लुटारू नसून साधारण व्यापारी होते. त्यांनी मुल्लाला प्रेतासारखे कबरीत झोपलेले पाहिले.
"तू कबरीत का झोपला आहेस? आम्ही तुला पळताना पाहिले. आम्ही तुझी काही मदत करू शकतो का? तू इथे काय करत आहेस?" - व्यापाऱ्यांनी मुल्लाला विचारले.
"तुम्ही लोक प्रश्न विचारात आहात पण हे जरुरी नाही की प्रत्येक प्रश्नाचे सरळ उत्तर असावे" - मुल्लाच्या आतापर्यंत सारे लक्षात आले होते - "सर्व काही आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनावर ठरते. मी इथे तुमच्यामुळे आहे आणि तुम्ही लोकं इथे माझ्यामुळे आहात."