Android app on Google Play

 

भिकारी

 

दिवस सगळ्यांचे पालटत असतात. एक वेळ अशीही आली की मुल्ला जेवणाला महाग झाला. खूप विचार केल्यानंतर मुल्लाला वाटले की भिक मागण्यापेक्षा चांगला धंदा दुसरा कोणता असू शकत नाही आणि तो शहरातल्या चौकात उभा राहून रोज भिक मागू लागला.
मुल्लाच्या चांगल्या दिवसात त्याची ओळख झालेल्या लोकांनी जेव्हा मुल्लाला भिक मागताना पाहिले तेव्हा ते त्याची टर उडवण्यासाठी त्याच्या समोर एक सोन्याचे आणि एक चांदीचे नाणे ठेवत आणि त्याला त्यापैकी एक नाणे निवडायला सांगत. मुल्ला नेहमी चांदीचे नाणे घेई आणि त्यांचे आभार मनात असे आणि ते सर्वजण मुल्लाची खिल्ली उडवत असत.

मुलाचा एक हितचिंतक हे पाहून खूप हैराण होत असे आणि दुःखी होत असे. एक दिवस संधी मिळताच त्याने मुल्लाला त्याच्या या विचित्र वागण्याचे कारण विचारले - "मुल्ला, तुम्हाला माहिती आहे की सोन्याच्या एका नाण्याची किंमत चांदीच्या कित्येक नाण्यांच्या बरोबर असते. तरीही तुम्ही सामान्य बुद्धीच्या माणसांप्रमाणे दर वेळी चांदीचे नाणे निवडून आपल्या शत्रूंना आपल्यावर हसण्याची संधी का देता?"

"माझ्या प्रिय मित्रा.." - मुल्ला म्हणाला - "मी तुला नेहमी सांगत आलो आहे की गोष्टी नेहमी दिसतात तशा नसतात. तुला खरेच असे वाटते का की ते लोक मला मूर्ख ठरवत आहेत? विचार कर, जर का एकदा मी सोन्याचे नाणे निवडले तर पुढच्या वेलीई ते मला चांदीचे नाणे सुद्धा देणार नाहीत. प्रत्येक वेळी त्यांना माझ्यावर हसण्याची संधी देऊन मी आता चांदीची एवढी नाणी जमवली आहेत की आता मला खाण्या - पिण्याची कोणतीही काळजी करण्याचे कारण उरले नाही."