मुल्ला बनला गुरु
एक दिवस बाजारात काही गाववाल्यांनी मुल्लाला घेराव घातला आणि त्याला म्हणाले, " नसरुद्दिन, तू एवढा आलीम आणि जाणकार आहेस, तू आम्हा सर्वांना शिष्य करून घे आणि आम्हाला शिकव की आम्ही कसे आयुष्य जगले पाहिजे आणि काय केले पाहिजे."
मुल्लाने विचार केला आणि सांगितले, "ठीक आहे. ऐका. मी तुम्हाला पाहिला धडा इथेच देतो. सर्वांत महत्वाची गोष्ट ही आहे की आपण आपल्या पायांची चांगली देखभाल केली पाहिजे, आपल्या वहाणा नेहमी दुरुस्त आणि स्वच्छ असल्या पाहिजेत."
लोकांनी मुल्लाचे बोलणे आदराने ऐकले. मग त्यांची नजर मुल्लाच्या पायांकडे गेली. त्याचे पाय खूपच घाण होते आणि चपला सुद्धा खूपच फाटलेल्या होत्या.
कोणीतरी मुल्लाला म्हणाले, "नसरुद्दिन, पण तुझे पाय तर खूपच घाणेरडे झाले आहेत, मळले आहेत आणि तुझ्या चपला सुद्धा एवढ्या फाटलेल्या आहेत की कोणत्याही क्षणी पायातून गळून पडतील. तू स्वतः तर स्वतःच्या शिकवणीची अंमलबजावणी करू शकत नाहीस आणि आम्हाला सांगतोस की आम्ही काय केले पाहिजे!"
"अच्छ?" मुल्ला म्हणाला, "पण मी तुम्हा लोकांसारखा कोणाला जीवन जगण्याचा धडा देण्याची गळ घालत नाही."