Get it on Google Play
Download on the App Store

पहिले पाऊल

नुकताच एका समारंभाच्या निमित्ताने एका स्नेह्यांकडे जाण्याचा प्रसंग आला. त्यांचा मुलगा अतिशय खोडकर, खट्याळ होता, सतत काहीतरी खोड्या करत होता, उलट बोलणे, टिंगल करणे चालू होते साधारण १२-१३ वर्षांचा असेल. त्याच्याकडे बघून सहजच एक विषय डोकावून गेला.....

बालकाचे समाजविरोधी वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी वय वर्षे १२ ते १६ या दरम्यान मुलांच्या वर्तनात हे बदल जाणवतात. बालकांनी केलेल्या गुन्ह्यात काही स्वार्थ नसतो केवळ बालकाची विध्वंसक प्रवृत्ती उफाळून येते आणि वर्तन घडते. खोटे बोलणे, चोरी करणे, ह्या कृती घडतात.सामान्य मूल आणि बालगुन्हेगार यांच्यात वर्तनाची सीमारेषा आखणे कठीण आहे दोघांतही विध्वंसक प्रवृत्ती असणे पण व्यक्तिपरत्वे ती वेगवेगळी असते. कोणतेही मुल जन्मतः गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसते त्याच्या सभोवतालची परिस्थिती त्याला गुन्हे करण्यास प्रवृत्त करते. यामध्ये बालकाच्या घरातील वातावरण अवतीभवती असणाऱ्या मित्रांचा, शेजारीपाजारी असणाऱ्या व्यक्तीचा मुलांवर परिणाम होत असतो.

या बालगुन्हेगारीची कारणमीमांसा करताना कौटुंबिक सामाजिक, शालेय कारणांचा विचार होईल,प्राप्त परिस्थिती ही बदलत चाललीये काळानुसार बदल अपेक्षित असले तरी आपल्या मुळाशी घट्ट  धरुन राहणे गरजेचे हीच जाणीव पोहचवणे यासाठी प्रामुख्याने कौटुंबिक पातळीचा आपण विचार केला तर..... बालक कुटुंबात जन्माला येते व वाढते तेथे आठराविश्व दारिद्र्य असेल तर त्याचा विपरीत परिणाम होतो. गरीब व श्रीमंत कुटुंबातील मुलांचे बालगुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण समान पण स्वरूप वेगळे असते. कुटुंबात पती-पत्नीची भांडणे, वादावादी ह्यांचा मुलांवर परिणाम होतो. कुटुंबकर्त्याची व्यसनाधीन यामुळे कुटुंबाचे अधःपतन होते, हे दुर्गुण मुलांना जडतात, तर श्रीमंत कुटुंबात मुलांकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नसतो. आई-वडील यांमधील वैचारिक मतभेद कुटुंबव्यवस्था खिळखिळी करतात, मुलांत बेबंदशाही वाढीस लागते मुले बालगुन्हेगारीकडे वळतात.

घरातील विविध संघर्षाचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो व त्यांच्या दबलेल्या भावना उफाळून येतात यातूनच बालगुन्हेगारी जन्माला येते. कुटुंबात असुरक्षित वाटल्यामुळे मुले बालगुन्हेगारीच्या वणव्यात होरपळली जातात व एका चुकीतून दुसरी अशा अनेक चुका करत जातात. शालेय व सामाजिक कारणांचा देखील विचार करताना बालकाच्या जीवनात येणारी दुसरी संस्कार संस्था शाळा असते. शाळेतील बेशिस्त, गटबाजी, जातीय द्वेष , सामंजस्य नसणे ह्याचा परिणाम देखील विद्यार्थ्यांना बालगुन्हेगारीकडे प्रवृत्त करतो तसेच प्रसारमाध्यमे, इंटरनेट यांचा प्रभाव असतोच. मोबाईल , सतत खुळखुळणारा पैसा यामुळे मुले भरकटत जातात व आपल्या साध्यापासून परावृत्त होत जातात. दुसरा मित्र असे वागतोय तर मग मी का नाही ? अशी भावना बळावू लागते.

संगतीमधून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी मुले अनेक वाईट गोष्टींकडे वळताना दिसतात, त्याची परिणीती बालगुन्हेगारीत होते मग ती कोणत्याही प्रकारची असेल. नुसते चोरी करणे, खोटे बोलणे म्हणजे गुन्हेगारी नव्हे तर बदलत्या काळात अनेक बाबींचा विचार होणे गरजेचे ठरेल. मुलांची संगत त्यांचे मित्र-मैत्रिणी यासर्व बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांच्या मानसिक कमकुवतीचा परिणाम त्यांच्या वर्तनातून दिसून येतो. तो कमकुवतपणा लपवण्यासाठी मुले बाहेर नकळत आधार शोधू लागतात व स्वतःच्या ध्येयाकडे दुर्लक्षित होत जातात. हा बदल त्यांना गुन्हेगारीकडे परावृत्त करतो यातूनच खोटे बोलणे, घरातील शिस्तीचा नियमभंग, पैसे चोरणे अशा कितीतरी दुष्टचक्रात ही मुले नकळत अडकली जातात त्यांना वेळीच बंधन घालणे गरजेचे ठरते पर्यायाने कुटुंब भविष्यात होणाऱ्या विवंचनेतून वाचू शकेल आधुनिक काळात या बालगुन्हेगारीचे स्वरूप बदलते ती मूळ वृत्ती तीच असते याचा विचार करावा लागेल. यावर आळा घालायला असेल तर सुरुवात घरापासूनच व्हायला हवी.

घर म्हणजे Home किंवा House जिथे प्रेम, आपुलकी, वात्सल्य, त्याग, संस्कार, भावभावना यांचा संबंध असतो. ते Home तर जे केवळ राहण्याच्या व्यवस्थेपुरते असते ते House मग या Home चे वातावरण या किशोरवयीन मुलांसाठी पोषक असायला हवे. प्रत्येक व्यक्तीचे संबंध जिव्हाळ्याचे असावेत तरच मुलांना घराची ओढ वाटेल व ते आपल्या विरंगुळ्यासाठी बाहेरील कुबड्यांचा आधार शोधणार नाहीत, योग्य त्या गोष्टी करण्याकडे आकर्षित होतील.

प्रत्येक गोष्टींसाठी योग्य वेळ असते हे ते जाणतील व आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतील. किशोरवयीन मुलांच्या मनात भावनिक अस्थिरता निर्माण होवून ते बालगुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी निरोगी वातावरण घरात असावे. यासाठी प्रेम, संरक्षण ,शिस्त, स्वातंत्र्य यांची योग्य सांगड घरात असायला हवी. कारण "अति सर्वत्र वर्जवते"  या उक्तीप्रमाणे या सर्वांचा अतिरेक टाळावा, मुलांकडे एकदम दुर्लक्ष किंवा फाजील लाड टाळून याचा सुवर्णमध्य गाठता येईल. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, त्यांचा सहवास योग्य आहे की नाही, मुले कोठे हिंडतात, फिरतात याकडे एक पालक म्हणून लक्ष पुरवावे. मुलांकडून अपेक्षा करताना पालक स्वतः देखील स्वतःवर बंधने लादू शकतील, कुटुंबापासून अति दूर राहिल्यामुळे, मुलांसमोर व्यसन, अश्लील शब्द, भांडणे, असभ्य वर्तन टाळले पाहिजे. अशा घरातील सुसंस्कारित वातावरणात वाढवणारी मुले बालगुन्हेगारीकडे वळणारच नाहीत. संगोपन म्हणजे तरी काय हो आपल्या सवे आपल्या मुळे होणारे मुलांचे संस्करण अनुकरण हा मुलांचा स्थायीभाव असतो मग संगोपनात हे पाळणे महत्वाचे..वर्तन वागणूक हे शेवटी अनुकरणातूनच येते ..

"दिवस तुझे हे फुलायचे" अशा सुंदर आयुष्याच्या टप्प्यांवर अशा वृत्तीमुळे मुले आपले भविष्य असुरक्षित, अंधकारमय करण्यापासून मागे हटतील आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या या सर्वांगीण बदलाला सामोरे जातील हा विश्वास मुलांना दोष देवून नाही तर त्यांच्यातील दोष निर्माण न होण्याचा आत्मविश्वास वाढवून केली पाहिजे.

कौटुंबिक पातळीवरचे "पहिले पाऊल" आपण चढलो कारण तरच दुसऱ्या पाऊलाकडे आपण योग्य बदलाने, विचाराने पाहू शकू सुरुवात घरापासूनच करूयात.......सध्याच्या या परिस्थितीत जास्त वेळ मुले आपल्यासमोर असतील तर याचा विधायक परिणाम दिसून येईल. समवेत घालवलेल्या गोड नियमांचे पालन करत  ममत्वाचे दर्शन म्हणजे संगोपनच कि...आपल्या रोजच्या दिनचर्येतून नकळत ते घडत जाते.  

©-मधुरा धायगुडे

मधुरा धायगुडे यांचे लेख 5

मधुरा धायगुडे
Chapters
रंगवल्ली आनंद..!! संगीतातील राग आणि आरोग्य .....!!!! मैत्री समान संधी मनातला आत्माराम ‘ती’चे आयुष्य जगताना कपभर चहा.....!!! मी कान बोलतोय....!! सकारात्मकता स्वतंत्रते भगवती गणपतीपुळे शब्दरुपी मानसयात्रा रेशीमगाठ ध्यान (Meditation) पहिले पाऊल मी मंदिरात नाही पाऊस सुख सुख म्हणजे.....!!! शून्याची ऊर्जा ....अमावस्या पु.ल. आनंदयात्री आँनलाईन पित्याची बदलती भूमिका... श्री गणेश अथर्वशीर्ष .सुफळ संपूर्ण चातुर्मास..एक वेगळा विचार आगळीवेगळी आषाढवारी ....!! 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी विस्कळित कुटुंब ...भाग 2..! धार्मिक वअध्यात्मिक यातील भेद मी आनंदी आहे फिरुनि नवी जन्मेन मी पुढच्या वर्षी लवकर या तिथींचे महालय स्मरण निस्सीम प्रेम...!! चल रे भोपळ्या...!! अलिप्त निमित्त गीता जयंती...!!!