गोप्या 38
'तुमच्या देशातील स्त्रिया देशासाठी मरायला नाही का उभ्या राहात?'
'तू ही हातात बंदूक घेतलीस?'
'मी स्त्रियांचे लक्ष्मीपथक स्थापले होते.'
'हिलाही गोळया गालून ठार करा. संपले का?'
'तो गोप्या अद्याप आहे.'
'आणा त्या हरामखोराला.'
ती भगिनी गेली आणि गोप्याला आणून उभे करण्यात आले.
'तू गोप्या ना.'
'हो'
'तुझ्याजवळ बंदूक होती.'
'खोटी गोष्ट. तुम्हाला सापडली का माझ्याजवळ?'
'मागे होती की नाही जवळ?'
'ती तर मी टाकून दिली.'
'एका प्रेताजवळ टाकलीस, चोरा. मुद्देमाल जवळ सापडू नये म्हणून. परंतु बावळटा, ही पाहा तुम्हा क्रांतिकारकांची एक चिठ्ठी सापडली आहे. क्रांती करायला निघालेत! आणि असे पुरावे मिळतात.'
'जगलो वाचलो नि पुन्हा क्रांती करायची वेळ आली ...... तर अशा चुका आम्ही करणार नाही. हा पहिला धडा होता.'
'तू का आता वाचशील?'
'तुम्हाला माहीत.'
'तुला सकाळी सात वाजता गोळी घालून ठार करण्यात येईल. समजलास?'
'मी कृतार्थ झालो. देशासाठी मरण येणे याहून भाग्याची गोष्ट कोणती?'
'घेऊन जा हरामखोराला.'
'तुमच्या देशात स्वातंत्र्यासाठी मरणाराला हरामखोर म्हणतात वाटते?'
'चूप.'