Get it on Google Play
Download on the App Store

गोप्या 12

'तू अद्याप लहान आहेस. कोवळा आहेस.'

'तसा फारसा काही लहान नाही. लौकरच सतरा-अठरा वर्षाचा होईन. मी कामाला वाघ आहे. माझ्या बापाचा मी मुलगा आहे. ते ज्याप्रमाणे मनात आले म्हणजे त्याप्रमाणे केल्याशिवाय राहात नसत. तसेच माझे आहे. तुम्ही जमीन द्या. मी तिच्यात सोने पिकवीन.'

'नदीकाठची जमीन देऊ? पलीकडे जंगल आहे तेथे तू एकटा राहशील?'

'नदीकाठची जमीन. मग तर फारच छान. पलीकडे जंगल असले म्हणून काय झाले? मला भयभीती माहीत नाही. वाघाला मी काठीने होलपटीन. एकदा मामाच्या घरी असताना गुरे घेऊन मी  रानात गेलो होतो. लांडगे आले. परंतु मी भ्यालो नाही. असा आरडाओरडा केला की लांडगे घाबरून पळून गेले.'

'तुझे नाव गोप्या; होय ना?'

'हो'

'आमच्याकडेच दोन दिवस जेवायला राहा. उद्या तुला मी जमीन देतो. नीट पिकव.'

'तेथे मी झोपडी बांधून राहिलो तर चालेल ना?'

'राहा ना. नाही तर कोठे राहणार? झोपडी बांध. आनंदाने राहा. तुला थोडे पैसेही कर्जाऊ देईन. बाळाचा तू मुलगा. पूर्वीचा ऋणानुबंध कसा विसरू? प्रेमाचे संबंध काही निराळे असतात. तुला लहानपणी बाळलेणे करण्यासाठी शेवटी मीच पैसे दिले. तुम्हाला म्हातारपणी मुलगा झाला असता तर तुम्ही केवढा उत्सव केला असतात, असे तो म्हणाला. गोप्या, तू केवढा मोठा झालास! आज बाळा असता तर त्याला धन्य वाटले असते.'

गोप्या दोन दिवस आपल्या त्या जन्मघरी राहिला. सावकार बापूसाहेब मोठे गोडबोले. गोप्या खूष झाला आणि एके दिवशी नदीकाठच्या त्या शेतीवर गोप्या राहायला गेला. तो दिवसभर शेतात खपे. त्याने जमीन साफ केली. हरळी खणून टाकली. बांधबंधारे नीट घातले. स्वत:साठी त्याने बाजूला एक झोपडी बांधली. लहानशी सुंदर झोपडी. झोपडीच्या चारी बाजूस त्याने मोकळे अंगण केले आणि एके दिवशी तो जंगलात गेला. जंगलातून त्याने बांबू तोडून आणले. आपल्या झोपडीच्या भोवती चारी बाजूस त्याने बांबूचे सुंदर रेलिंग केले आणि चारी बाजूंना फुलझाडे लावली. तुळशी लावल्या. तेथे झेंडू होते. गुलाब होते. गोप्याच्या मामाच्या घरी मोठी बाग होती. गोप्याला सारी माहिती होती. दिवसभर थकलेला गोप्या तेथे मोकळया अंगणात शिंदीच्या चटईवर बसे आणि गोड गोड बासरी वाजवी.

एके दिवशी तो असाच बासरी वाजवीत होता. सायंकाळ झाली होती. आकाशात शेकडो रंगछटा पसरल्या होत्या. कृष्णवर्ण मेघांतून डोक्यावर किरीट घातलेला कृष्णच उभा आहे की काय असा भास होई. भूमीवरच्या गोपाळची मुरली ऐकायला का गोपाळकृष्ण वर उभा होता? गोप्याला भान नव्हते, परंतु त्याचे धनी बापूसाहेब तेथे येऊन उभे होते. थोडया वेळाने बासरी थांबली. गोप्या उठला. तो तेथे बापूसाहेब उभे. तो शरमला. वरमला.

'तुम्ही केव्हा आलेत? बासरी वाजवताना मला भान राहात नाही. बसा. रागावू नका.'

'किती छान वाजवतोस तू ! आता येथे एकच गोष्ट कमी आहे.'

'कोणती'

'येथे एक गाय हवी. म्हणजे तू खरोखरच गोपाळ होशील आणि गोप्या, येथे तू अगदी सिमला केला आहेस रे ! जणू साहेबांचा बंगला. हे बांबूचे रेलिंग आणि ही फुलबाग. अरे, एवढा थाट कशाला हवा?'

'आमच्या गरीबाच्या नाकाला का फुलांचा वास आवडत नाही? मी तुमची जागा घेऊन कोठे जात नाही. ही तुमचीच जमीन. परंतु मी तिला शोभवीत आहे. तुम्हीही पूजेला दुर्वा, तुळशी, फुले नेत जा. तुम्हालाही येथे फिरायला यावे असे वाटेल. येत जा, बापूसाहेब.'

'गोप्या, तू असा एकटा किती दिवस राहणार?'

'दोन - चार वर्षे जाऊ देत. जवळ चार पैसे जमा होऊ देत. मग करीन लगीन. सध्याच काय घाई आहे?'

'तुझा बाप असता तर त्याने कधीच तुझे लग्न लावून दिले असते. तुझे लग्न व्हावे असे मला वाटते. मी मदत करीन, बरे का गोप्या!'

'आभारी होईन'

गोप्याने फुलांचा एक गुच्छ करून बापूसाहेबांना दिला. ते खूष झाले नि गेले. गोप्या अंगणात फिरत होता. गाय पाहिजेच, असे त्यालाही वाटले. त्याने पुढे एक गाय विकत घेतली. सुंदर गाय! तो तिची सेवा मनापासून करी.