गोप्या 17
'सारे अंग दुखते. दुसरेही काही दुखणे आहे. काय काय सांगू?'
'सारे माझ्या लक्षात आले. मी सांगतो औषध. तुझ्या झोपडीत पलीकडे जंगल आहे. जंगलात जा आणि कातरपानांची वेल असते ती माहीत आहे ना?'
'हो. पुष्कळ आहे ती वेल.'
'बस्स. त्या वेलीचा पाला आण. दिवसातून तीन वेळा बोंडले बोंडले रस बायकोला दे. सात दिवस असे कर. ठणठणीत बरी होईल. अरे, देवाने गरिबांसाठी जिकडे तिकडे उपाय ठेवले आहेत. त्या सुया आणि टॉनिक सारे श्रीमंतांचे चोचले आणि एकदा घरात डॉक्टर आला की तो बाहेर पडत नाही. डॉक्टर म्हणजेच जणू रोगाची साथ. तू त्या डॉक्टरांच्या फंदात पडू नकोस. आता आला आहेस तर पोटभर जेवून जा. रात्री वाटले तर येथेच झोप. पहाटे उठून जा. बायको फारच आजारी असेल तर आताच जा. परंतु जेवल्याशिवाय जाऊ नकोस. तुझा बाप बाळा हक्काने जेवायला यायचा. आमच्याकडचे लोणचे त्याला फार आवडे. जा. हातपाय धू. विहिरीवर बादली आहे.'
गोप्या सावकाराच्या भाषणाने खूष झाला. तो पोटभर जेवला. रात्री तेथेच तो झोपला; पहाटे उठून तो गेला. तो आधी घरी गेला नाही. तो परभारे जंगलातच गेला. त्या कातरवेलीचा पाला त्याने गोळा केला. तो पाला घेऊन तो घरी आला. तारा अंगणात होती.
'काय तारा, आई कशी आहे?'
'बरी नाही आई. तुमचीच वाट पाहात आहे.'
गोप्या झोपडीत शिरला. मंजी विव्हळत होती. कण्हत होती.
'आणलात का डॉक्टर?'
'मी औषध घेऊन आलो आहे. कातरवेलीच्या पाल्याचा रस सात दिवस घ्यायचा. रोज तीन वेळा. मी तुला रस काढून देतो हं. होशील, लौकर बरी होशील.' असे म्हणून गोप्याने पाल्याचा रस काढला. जवळ जवळ दोन बोंडली रस निघाला.
'थोडा जास्त होईल. परंतु गुण लवकर येईल. घे हा रस. वर हे सुपारीचे खांड खा.'
मंजीने तो रस घेतला. वरती थोडे पाणी ती प्याली. ती पडून राहिली. गोप्या जवळ बसला होता.
'मी जाऊ का शेतात?'
'जा. घरी बसून कसे होईल?'
'पोरे जेवली का? तू काही खाल्लेस का?'
'माझी वांच्छा नाही. तुम्ही भाकर खाऊन घ्या.'
'मला भूक नाही आज. काल श्रीपतरावांकडे दोन दिवसांचे जेवून घेतले आहे. तू पडून राहा. मी सांजचा येतो. धीर नको सोडू.'
गोप्या निघून गेला. तारा आईजवळ होती. दिनू नि विनू बाहेर खेळत होते. मंजीच्या पोटात मनस्वी कळा येऊ लागल्या. ती रडू लागली. तारा घाबरली.
'आई, बाबांना बोलावू का?'
'नको बाळ. तू जवळ आहेस तेवढी पुरे.?'
मंजी उठून बाहेर शैचाला गेली. परत आली. परंतु अंथरूणावर पडते न पडते तो पुन्हा कळ आली. पुन्हा ती शौचाला गेली. अतिसार जणू सुरू झाला. ती आता बाहेर जाऊन जाऊन गळून गेली. परंतु आपल्या पायी ती बाहेर जात होती. तेथे घरात कोठे बसणार?
सायंकाळ झाली. देव मावळला. परंतु गोप्या अद्याप घरी आला नाही.
'तांबू आली का घरी?' मंजीने विचारले.
'आली. बांधली.' तारा म्हणाली.