गोप्या 31
'तुला अन्नाला मोताद करीन.'
'गोप्या, आम्ही तुला पोसू.' ते मजूर म्हणाले.
'तुम्ही लागा रे कामाला.'
'महात्मा गांधीकी जय !' त्यांनी सर्वांनी गर्जना केली.
गोप्या तेथून निघून गेला. इतर मजूर काम करू लागले. मधून मधून ते 'तिरंगी झेंडाकी जय,' 'महात्मा गांधी की जय', अशी गर्जना करीत होते आणि मालक झाडाखाली बसून त्या नवगर्जना ऐकत होता, दांतओठ खात होता. आपल्या मुठी जमिनीवर आपटीत होता. नवयुगधर्म त्याला केव्हा कळणार?
गोप्या आता शेतक-यांत प्रचार करी. रात्री निरनिराळया ठिकाणी तो जाई. त्यांना अनेक गोष्टी समजावून देई. त्याने ग्रामकाँग्रेस समितीही स्थापली. काँग्रेस शेतकरी-कामकरी संघही त्याने स्थापिला. तो सर्वांचा आवडता झाला. त्यालाही आत्मविश्वास आला. तो सुंदर बोले. गाणी म्हणे. त्याच्याकडची जमीन काढून घेण्यात आली. परंतु त्याची झोपडी तेथेच होती. इतर शेतकरी - कामकरी त्याला काही कमी पडू देत नसत. तो त्यांना नवजीवन देत होता. तो त्यांना नवीन प्रकाश देत होता. नवयुगधर्म तो त्यांना शिकवीत होता. तो त्यांना विचाराची भाकर देई; ते त्याला धान्याची भाकर देत.
आणि गोप्याचे नाव तालुक्याच्या मुख्य गावाला जाऊन पोचले. त्याची किर्ती पसरली. त्याला व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली. परंतु तो अद्याप जात नसे. त्याला बाहेर जायला धीर होत नसे. एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय सप्ताह त्या वेळेस सुरू होता. ६ एप्रिल ते १३ एप्रिल. जालियनवाला बागेतील कत्तलीचे ते दिवस. शेवटचा तेला तारखेचा दिवस हिंदुस्थानभर हुतात्मा-दिन म्हणून पाळण्यात येई. तालुक्याच्या ठिकाणी त्या दिवशी प्रचंड सभा भरणार होती.
शिवापूर हेच तालुक्याचे मुख्य गाव. दौल्या तेथेच राहात होता. दौल्या तेथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना म्हणाला, 'हुतात्मा दिनाच्या दिवशी गोपाळपूरच्या गोप्याला बोलायला बोलवा. तो फार सुंदर बोलतो.' त्याप्रमाणे काही काँग्रेस कार्यकर्ते गोपाळपूरला आले. रात्री त्यांनी सभा घेतली. सभेनंतर थोडी चर्चा करीत ते बसले.
'काय गोपाळराव, मग येणार ना शिवापूरला? याच.'
'मला गोपाळराव म्हणू नका. गोप्या नावच मला आवडतं.'
'परंतु सभेत गोप्या म्हणून कसे म्हणायचे?'
'त्याला गोपाळदादा म्हणा, किंवा भाई गोपाळ म्हणा.'
'गोपाळदादा हेच नाव ठिक आहे.'
'गोप्या, जा शिवापूरला. तेथेही कर ठणठणीत भाषण. मिळव टाळया. आपल्या गावाचे नाव सर्वत्र होईल. वर्तमानपत्रांत येईल. आमच्या गोप्याचा फोटो आला पाहिजे बघा 'नवाकाळ' त.' एक शेतकरी म्हणाला.
शेवटी हो ना करता करता गोप्याने यायचे कबूल केले.
ती पाहा शिवापूरची प्रचंड सभा. खेडयापाडयांतून हजारो शेतकरी आले आहेत. तो पहा मोठा तिरंगी झेंडा डौलाने फडफडत आहे. खांद्यावर घोंगडी घेतलेला गोप्या एका खुर्चीवर बसला आहे. त्याच्याकडे लोक कुतूहलाने पाहात आहेत.