गोप्या 19
'आता मी आलो आहे. मी बरी करतो. तू नीज पोरी.'
तारा अंथरूणावर पडली. गोप्या जवळ बसला. तो तिचे अंग चेपीत होता.
'तुम्ही भाकर खा नि मग बसा.'
'आज पोट भरलेले आहे.'
'मी सांगते भाकर खा. आज सांगेन. पुन्हा नाही सांगणार!'
आज मला नाही म्हणू नका. माझे सारे ऐका. जा उठा. पोटभर भाकर खा. माझ्या वाटची पण खा. खरेच जा.
गोप्या उठला. त्याने भाकर खाल्ली. त्याचे डोळेही भरून येत होते. तो चूळ भरून पुन्हा मंजीजवळ येऊन बसला.
'पोटातील कळा आता थांबल्या.' ती म्हणाली.
'आता बरी होशील. सारी घाण निघून गेली.'
'तुम्ही पडा.'
'तुझ्या जवळ बसून राहतो. तुला झोप येते का?'
'मला आता अखेरचीच झोप लागणार आहे.'
'असे नको बोलूस.'
'खोटी आशा नको. माझा जीव आत ओढत आहे. तुमची मंजी घटकेची सोबतीण आहे. जपा तुम्ही सारी. गोड आहेत पोरे. ताराचे लगीन झाले म्हणजे मग काही फार पसारा नाही. वाटले तर पुन्हा लगीन करा.'
'तू बोलू नकोस. माझ्या मांडीवर डोके ठेव. मंज्ये, तुला मी सुख दिले नाही.'
'किती तरी सुख दिलेत. सोन्यासारखी मुले दिलीत. प्रेम दिलेत. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. पुसा डोळे. पुरूषांनी रडू नये.
तुमचे प्रेम आठवते. ती फुले आठवतात. केसात घातलेली वेणी आठवते.'
'तू बोलू नकोस.'
'हे शेवटचे बोलणे. पुन्हा का मी बोलायला येणार आहे? जपा सारी. सांभाळा. तांबूला कधी विकू नका. दिनू, विनू यांना तिचा लळा.'
मंजी थकली. हळूहळू बोलणे संपले. डोळे मिटून ती पडली होती. बाहेर पहाट झाली. टपटप दवबिंदू पडत होते. तिकडे कोंबडा आरवला. आणि मध्येच तांबू हंबरली, का बरे? तांबू का कोणाला हाक मारीत होती? का तिला यमदूत दिसले?
'तारा, दिनू, विनू, गोड पोरे, देव सुखी ठेवो. तुम्ही जपा. सुखी राहा. राम.' मंजीने राम म्हटला.