गोप्या 37
ते घोडेस्वार आले. झोपडीला त्यांनी वेढा दिला. लाथ मारून त्यांनी दार उघडले. आत ती दोन बाळे शांतपणे झोपली होती.
'ती बघा कार्टी झोपली आहेत.'
त्यांना लाथ मारून उठवण्यात आले. त्यांना छडया मारण्यात आल्या. ती बाळे घाबरली.
'तुमचा बाप कुठे आहे?'
'आमचा बाप?'
'हो, हो, तुमचा बाप तो गोप्या. सांगा लौकर.'
'आम्हाला माहीत नाही. आई गेली, परत आली नाही. ताई गेली, परत आली नाही. बाबा गेले, तेही परत आले नाहीत. कोठे आहेत आमचे बाबा! आम्हाला कोणी नाही. आम्ही फक्त दोघे भाऊ आहोत. द्या आमचे बाबा शोधून.'
'पोपटाप्रमाणे बोलायला तुम्हाला बापाने शिकवून ठेवले आहे असे दिसते. बोला, सांगता की नाही?'
त्या पोरांना बेदम मारून एका कोप-यात फेकून देण्यात आले. त्या झोपडीत त्या शिपायांनी शोधले. परंतु गोप्या सापडला नाही. ते बाहेर येऊन शोधू लागले. एकाने गाईला छडी मारली! गरीब मुके जनावर. इतक्यात तिच्या पुढच्या गवतात एकाने काठी घातली, तो तेथे गोप्या आढळला !
'अरे, हा पाहा हरामखोर! आता गाईसमोर गवतात तोंड लपवतोस?' 'चले जाव' गर्जना करीत होतास ना? शेतक-या-कामक-यांचे राज्य स्थापणारे असे गाईसमोर लपत नाहीत. मुर्दाड बेटे! चालले स्वराज्य स्थापायला. ओढा साल्याला. काढा फोडून. बंडखोर.' तो अधिकारी गर्जला.
'अपमान कराल तर एकेकाला चावून खाईन. खुशाल गोळी घाला वा फाशी द्या. फाजील बोलू नका.' गोप्या उभा राहून बोलला.
'बांधा हरामखोराच्या मुसक्या. चला त्याला घेऊन.'
गोप्याला ते लोक घेऊन गेले. दिनू नि विनू 'आमचे बाबा, आमचे बाबा!' करीत पाठोपाठ रडत येत होते. त्यांना छडया मारून पिटाळण्यात आले. गोप्याला एका खास लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यात आणखी सहा माणसे होती. पाच पुरूष होते. एक स्त्री होती.'
सर्वांवर बंड करण्याचा आरोप होता. गोप्या येताच त्यांनी त्याचे स्वागत केले.
रात्रीची वेळ होती. लष्करी अधिकारी एका प्रशस्त खोलीत बसले होते. तोंडे त्रस्त नि गंभीर होती.
'थकलो बुवा या धरपकडी करून. आता यांचे खटले किती दिवस पुरणार?' एक म्हणाला.
'त्या सात जणांचा तर ताबडतोब निकाल लावता येईल. ते तर उघड बंडखोर. पुरावाही आहे.' दुसरा म्हणाला.
'खरेच. त्या सातांची ब्याद काढून टाकावी. बोलवा एकेकाला. मुख्य अधिकारी म्हणाला.
ते गोप्याचे लॉकअप उघडण्यात आले. एकाला त्या लष्करी न्यायासनासमोर नेऊन उभे करण्यात आले.
'काय रे, तू होतास की नाही बंडात?'
'आमचे हे स्वातंत्र्याचे युध्द होते.'
'तू त्यात पुढाकार घेतलास की नाही? शस्त्रे होती की नाही?'
'माझा स्वतंत्र तालुक्याला तो अधिकार आहे.'
'म्हणजे शस्त्रेही वापरलीत, लढलेत, गोळीबार केलेत. खरे ना? तुला मरणाची सजा. सकाळी ७ वाजता गोळी घालून याला ठार
करा.'
त्याला परत नेण्यात आले नि दुस-याला आणण्यात आले. त्याचा निकाल त्याचप्रमाणे. सहावी ती स्त्री आली.
'तू तर बाई. आणि बंडात सामील?'