Get it on Google Play
Download on the App Store

गोप्या 7

पुढे मामाने भाच्याला शाळेत घातले. एकदोन इयत्ता झाल्या. परंतु गोपाळचे अभ्यासात लक्ष नसे. तो खेळण्यात पटाईत होता. खोडया करण्यात त्याचा पहिला नंबर. मुलांचा तो म्होरक्या होता. परंतु मास्तर त्याच्यावर रागवत. एके दिवशी तर पंतोजी फारच संतापले व म्हणाले.

'गोप्या, चालता हो शाळेतून. तुला काही यायचे नाही. कशाला येतोस शाळेत? घरी राहशील तर मामांची गुरे तरी राखशील. थोडा उपयोग तरी होईल तुझा. येथे दगडासारखा बसून काय फायदा? तू नुसता नंदीबैल आहेस. साधा हिशेब तुला समजत नाही. अजून गुणाकार चुकतोस आणि तुला त्याची लाजही नाही. हो चालता.'

आणि गोप्या खरेच पाटीदप्तर घेऊन घरी आला. मामा अंगणात उभे होते.

'काय रे गोप्या, घरी का आलास?' त्यांनी विचारले.

'मास्तर म्हणाले, तू शाळेत नको येऊस. घरीच राहा. मग काय करू?'

'अरे त्यांनी असे सांगितले म्हणून आपण का निघून यायचे? तू अभ्यास करीत नसशील म्हणून ते तसे म्हणाले. चल, मी तुला शाळेत पोचवितो. सांगतो मास्तरांना, की गोप्या अभ्यास करील उद्यापासून; चल.'

'मी नाही शाळेत जाणार, मामा. मास्तर म्हणतात की तू मामाची गुरे राख. मी गुरे राखायला जाईन. नको ती शाळा. कोंडवाडा. खरेच, नको मामा.'

'तुझ्या नशिबीच विद्या नसली तर तू तरी काय करणार? ठेव पाटी-दप्तर घरात. उद्यापासून जा शेळया-मेंढया घेऊन; जा गायीगुरे घेऊन, सांभाळून आणीत जा म्हणजे झाले.'

आणि गोप्या आता गुराखी झाला. त्याला गोपाळ कोणी म्हणत नसे. गोप्या हेच नाव घरीदारी झाले. तो इतर गुराख्यांचा आवडता झाला. तो त्यांचा पुढारी बनला. तो नदीत डुंबे, झाडावर चढे, कुस्ती करी, पावा वाजवी. दुपारच्या वेळेस सर्व गुराखी एकत्र बसत. गोपाळ आपल्यातील चटणी-भाकर इतरांना देई. जणू तो त्यांचा गोपाळकृष्ण होता.

काही वर्षे अशी गेली. एकदा एक मोठीच गंमत झाली. गोप्याचा मामा जिल्हा बोर्डाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार होता. त्याने मोठमोठया जमीनदारांना, सावकारांना एक मोठी मेजवानी देण्याचे ठरविले. रात्री मेजवानी होती. गाणे होते. मोठा थाट होता. गोप्याच्या मामाच्या घरी त्या दिवशी कोण गर्दी.

गावोगावचे बडे बडे पाहुणे आले होते. कोणी छकडयांतून आले. कोणी टांग्यांतून आले. कोणी मोटारींतून आले. नाना प्रकारची वाहने तेथे आली होती.

मोठी पंगत झाली. नाना पक्वान्ने होती. जेवण झाल्यावर सारी मंडळी दिवाणखान्यात बसली. विडे-पानसुपारी सर्व काही झाले. अत्तर-गुलाबादी प्रकार झाले आणि मग गाण्याची बैठक सुरू झाली. मध्यरात्र होऊन गेली. गाण्याला चांगला रंग चढला. वाहवा वाहवा असे धन्योद्गार निघत होते. मध्यंतरी चहा-कॉफी होऊन पुन्हा गाणे सुरू झाले.

परंतु गोप्या इकडे काय करतो आहे? त्याच्याभोवती हे सारे गुराखी कशाला जमले आहेत? काय आहे कारस्थान? कोणते चालले आहेत त्यांचे बेत?

'गोप्या, करायची का मजा? मोटारींचे टायर पंक्चर करून ठेवू. मारू खिळे त्यांच्यात. आणि छकडे नि हे टांगे त्यांच्या खिळ काढून ठेवू म्हणजे पटापट चाके घळघळतील. सारे आपटतील खाली. गंमत होईल. घरात एवढा समारंभ चालला आहे, परंतु तुला गोड घास तरी मिळाला का?' एक गुराखी म्हणाला,

'आपण करूच या गंमत.' दुसरे म्हणाले.

'काही हरकत नाही. ही बडी धेंडे आपटू देत चांगली. अद्दल घडू दे.' गोप्या म्हणाला.