गोप्या 24
लहान विनूला घेऊन गोप्या शेतावरून घरी आला. त्याने विनूला खांद्यावरून खाली ठेवले.
'दादा, ही बघ माझ्या कानात फुले !' विनू म्हणाला.
'छान दिसतात.' दिनू म्हणाला.
'काय रे ते हातात?' गोप्याने विचारले.
'बाबा, हे पत्र ना हो?' कोणाचे आले आपल्याला पत्र? ताईचे? कोणाचे बाबा? आपल्याला कधीसुध्दा कोणाचे पत्र येत नसे. आज
हे पहिलेच पत्र. नाही का, बाबा? आणि हे पुडके पाहा. त्याच्यावर तिकीट आहे. पत्राबरोबरच हे पुडककेही आले; होय ना बाबा?'
'किती रे बडबड! दे ठेवून ते पत्र नि पुडके. तुम्ही निजल्यावर वाचीन. भराभर वाचायला थोडेच येणार आहे? एकेक अक्षर लावून वाचावे लागेल आणि तुझे अजून 'ग म भ न' च चालले आहे ना?'
'नाही काही; 'सगुणा, दुधाची वाटी आण' येथपर्यंत झाले आहे, बाबा.'
'लौकर शहाणा हो, म्हणजे ताईला तू पत्र लिहिशील. तिला किती आनंद होईल?'
'बाबा, ताईला बोलवा ना घरी.'
'बोलवू हो.'
रात्री दिनू, विनू झोपले आणि गोप्यानेते पाकिट फोडले. ठसठशीत अक्षरात ते पत्र होते. तो ते पत्र वाचू लागला. पुढीलप्रमाणे ते पत्र होते.
"वंदे मातरम'
'' प्रिय गोप्यादादा यांना
दौल्याचे दंडवत.
तुम्ही मला झोपडीतून घालवून दिले होते. मी दौल्या. तुमचा मुलगा सोन्या, याचा मी मारेकरी. तो ठार मरावा म्हणून मी काही तो लोखंडी तुकडा फेकून मारला नव्हता. मला त्या वेळेस किती वाईट वाटले. तुम्ही मला जा म्हणून सांगितलेत. मी गेलो. तुमच्यावर तरी ओझे कशाला असा मी मनात विचार केला. तुमचा संसार वाढत होता.
आज मी हे पत्र का बरे लिहीत आहे? तुम्हाला अतिदु:खाची अशी वार्ता कळविण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. तुमची तारा येथे शिवापुरात होती. मी या शिवापुरात राहतो. मी एक टांगेवाला आहे. माझा धंदा नीट चालला आहे. मी तुमच्याकडून गेलो लिहावाचायला शिकलो. मला पुष्कळ कळू लागले. मी सभांना जाऊ लागलो. मला कॉग्रेसचे प्रेम वाटू लागले. मी टांगेवाल्याचे युनियन स्थापले आहे. मी सेक्रेटरी आहे. मी सभांतून बोलतो. एकदा काँग्रेसच्या चळवळीत तुरूंगातही जाऊन आलो.
परंतु मी हे काय लिहीत बसलो? माझीच हकीगत सांगत सुटलो ! या गोष्टी एवढयाचसाठी लिहिल्या की, तुमच्याकडून मी गेलो त्यामुळे माझे कल्याणच झाले. मला जणू नवीन दृष्टी आली.
तुमची तारा येथे कामाला राहिली. एखादे वेळेस तारा मला भेटत असे. ती तळयावर धुणी धुवायला जात असे. किती तरी धुणे असे. ती दमून जाई. ती कधी भाजी विकत घेण्यासाठी बाजारात येई, तेव्हा तिची माझी भेट होई. मी तिच्याजवळ अनेक गोष्टी बोलत असे. तू लिहायला शीक म्हणून मी तिला सांगत असे. मी तिला पाटीपुस्तके दिली आणि मिळेल तो वेळ ती शिकण्यात दवडी. मी तिला गाणी लिहून दिली. ती तिने पाठ केली. तुमची तारा मनाने, बुध्दीने वाढत होती.
परंतु धन्याला ह्या गोष्टी सहन झाल्या नाहीत. काम करता करता, केर काढता काढता, पाळण्यात मुले आंदुळताना किंवा झोपाळयावर त्यांना घेऊन बसताना तारा काँग्रेसची गाणी गुणगुणे. तिरंगी झेंडयाची गाणी म्हणे. त्या मिलिटरी पेन्शनर माणसाला भय वाटले. आपण राजद्रोही ठरायचे असे त्याला वाटले. तो ताराला म्हणाला, 'खबरदार अशी गाणी म्हणशील तर !पोलिसांच्या ताब्यात देईन.' तिचे शिकणे सवरणे बंद करण्यात आले. तारा दु:खीकष्टी झाली.