Get it on Google Play
Download on the App Store

गोप्या 11

गोप्याचा संसार सुरू झाला

गोप्या गोपाळपूरला आला. त्याने आपले ते जुने घर दूरून पाहिले. त्या घराला त्याने प्रणाम केला. त्या घरात तो जन्मला होता. त्या घरातच त्याचे वडील निवर्तले. त्या घराकडे बघत गोप्या रस्त्यात उभा होता. त्याच्या मनात कोणते विचार उसळले होते? कोणत्या भावना उचंबळल्या होत्या? त्यालाही ते सांगता आले नसते.

'काय रे पाहतो आहेस? कोणी परका दिसतोस. चोरीचा विचार आहे की काय? नीट पाहून जातो आहेस असे वाटते? तुझे नाव काय! कोठला तू.' घराच्या मालकाने बाहेर येऊन विचारले.

'माझे नाव गोपाळ. मला सारे गोप्या म्हणून हाक मारतात. मी या गावाला आजच आलो, परंतु ज्या घरात तुम्ही आहात, त्या घरात मी जन्मलो होतो.'

'या घरात?'

'हो, या घरात मी जन्मलो. याच घरात माझे वडील देवाघरी गेले. म्हणून या घरासमोर उभा राहिलो होतो.'

'तुझ्या बापाचे नाव काय?'

'बाळा'

'तू बाळाचा का मुलगा? तो एवढासा लहान गोपाळ तो तू? इतकी वर्षे कोठे होतास? तुझी आई कोठे आहे?'

'माझी आई बहुधा देवाघरी गेली. मामाकडे मला निजवून ती गेली. पुन्हा या गोप्याला ती दिसली नाही. या पोरक्या गोप्याला मामाने इतकी वर्षे वाढविले. परंतु आता मी स्वतंत्रपणे राहायचे ठरविले आहे. अपमानाचे मिंधे जिणे नको. स्वाभिमानाची भाकर  तिची सर कशालाही येणार नाही. मी माझ्या जन्मग्रामी येऊन राहण्याचे ठरविले. काल रात्री मी गावाबाहेरच्या देवीच्या देवळात येऊन झोपलो होतो; आणि उजाडल्यावर गावात माहिती विचारीत हिंडत, बाळा शेतक-याचे घर कोठे होते असे विचारीत मी येथे आलो. मी उभा राहिलो म्हणून रागावू नका. माझ्या मनात किती तरी विचार आले. माझे बाबा कसे दिसत असतील? मला काही आठवत नाही. आईची सुध्दा मला नीट आठवण नाही. कसे दिसत हो माझे बाबा? तुम्ही पाहिले होते का त्यांना?'

'अरे, पाहिले होते म्हणून काय सांगू? त्याचा माझा किती घरोबा !बाळा रोज आमच्याकडे यायचा. धिप्पाड होता. त्याच्या मिशा मोठया रूबाबदार असत. अंगाने उंच. रंगाने काळासावळा. डोक्याला पिवळा फेटा बांधायचा. हातात जाड सोटा असायचा. भिती त्याला माहीत नव्हती. तुझी आई एक गरीब बाई होती. परंतु जरा उजळ रंगाची होती. तू आईच्या वळणावर गेला आहेस. तुझ्या आईचे डोळे विशेष भरण्यासारखे होते असे सांगतात. तुझे डोळे तसेच आहेत. तुझ्या बापाने पुन्हा पुन्हा लग्ने केली. कर्जबाजारी झाला. मी त्याला किती सांगितले की हा लग्नाचा नाद पुरे कर म्हणून. परंतु तो हटवादी होता. एकदा त्याच्या मनात आले की त्याप्रमाणे केल्याशिवाय तो राहात नसे. तो मेला परंतु तुला मात्र काही उरले नाही.'

'हा देह देऊन तर गेले ना? ते पुन्हा लग्न न करते तर मी कसा जन्माला आलो असतो? मला त्यांनी ही शरीरसंपत्ती दिली आहे. पुष्कळ आहे. सांगा, बाबांच्या गोष्टी मला सांगा. हे आमचे घर तुम्ही लिलावात घेतले वाटते?'


'हो, आम्ही आता पुष्कळ सुधारणा केल्या आहेत. जुने घर म्हणायचे. परंतु नवीनच जणू झाले आहे. तू का येथे शेती करणार?'

'असे मनात तर आहे. तुमच्याजवळ आहे का खंडाने द्यायला जमी न? मी खपेन, कष्ट करीन. तुमचा नि माझ्या वडिलांचा ऋणानुबंध होता, घरोबा होता. त्यांचाच मी मुलगा. तो घरोबा पुन्हा सुरू करू या. मी या गावात नवीन आहे. ओळख ना देख. तुम्ही देता का आधार? माझ्याजवळ पैसे भांडवल नाही. थोडी जमीन द्या करायला. थोडे कर्जाऊ पैसे द्या. बघा. बाळाच्या मुलाला नीट मार्गाला लावा. माझी गाडी नीट सुरू करून द्या.'