Get it on Google Play
Download on the App Store

गोप्या 16

काही दिवस गेले. घरात ओढाताण असे. पोटभर खायला मिळत नसे. मंजी मुलांना वाढी. पतीला ठेवी नि स्वत: उपास काढी. शेतात दाणे यंदा फार झाले नाहीत. खंडही पुरा देता आला नाही. बापूसाहेब रागावले. ते एके दिवशी येऊन म्हणाले,

'गोप्या, शेत तुझ्याकडून काढून घेतले पाहिजे. मागील वर्षाची बाकी आहेच, या वर्षी दाणा घातला नाहीस. असे कसे चालेल?'

'आमच्या घरात तरी का आम्ही कोठारे भरून ठेवली आहेत? शेती पिकले म्हणजे का देत नाही? घरात आम्हालाही खायला नाही बघा. कसा तरी आला दिवस ढकलतो.'

'मंजी कुठे गेली? ती अलीकडे तोंड दाखवीत नाही.'

'कसे दाखवायचे तोंड? तुमची बोलणी ऐकून घ्यायला का येऊ? तुमचे सारे देणे देऊ. मग तोंड दाखवू. मंजी बाहेर येऊन
म्हणाली.

'इथली बाग वगैरे कोठे गेली?'

'संसाराची होळी होऊ लागल्यावर बागा फुलवायला कुठला वेळ आणू? दिवसभर राबावे, उपाशी पडावे. कोठली फुले नि फळझाडे? शेतक-याचा संसार असाच चालायचा.'

'अरे, पुढील वर्षी पाऊस नीट पडेल, भरपूर दाणे होतील. शेतक-याने कधी हिंमत सोडू नये. समजलास?'

'तो कधी सोडतो दादा धीर? पाऊस येवो न येवो; तो शेत तयार करून ठेवतो. आशेवरच तो जगतो. आकाशाकडे त्याचे डोळे असले, तरी तो स्वस्थ बसत नाही. त्याचे काम सुरूच असते.'

बापूसाहेब गेले, गोप्या शेतात गेला. मंजी आज घरीच होती. तिने घरात दाणे होते ते दळले. ते जाते तिला एकटीला ओढवत नसे. तारा हात लावी. परंतु ती मुलीला म्हणायची, 'नको तारा, तू जा विनूला घेऊन. जा नदीकाठी. आणा रानफुले गोळा करून.'

काही महिने गेले, एके दिवशी गोप्या घरी आला तो मंजी अंथरूणावर होती.

'काय गं, बरे नाही का वाटत?'

'आज धरले अंथरूण. इतके दिवस कसे तरी ढकलले. परंतु आज इलाज चालेना. पाय उचलेना. काय करायचे?'

'तुला औषध द्यायला हवे.'

'कोठून आणायचे औषध? औषधाला पैसे हवेत. गरिबांनी असेच पडून राहायचे. बरे वाटले म्हणजे उठायचे. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. मला आता कामाला जाता येणार नाही. एकटया तुमच्यावर भार.'

'असे मनात नको आणू. मी तुला आधीच विसावा दिला पाहिजे होता. तुझे अंग दुखे, कमर दुखे. तरी तू कामाला यायचीच. मी लक्ष दिले नाही. थांब. आज मी एका सावकाराकडे जातो. पंचवीस रूपये मागतो. एक डॉक्टर आणतो. तो सुई टोचील. बरी होशील.'

'कोण देणार पंचवीस रूपये? काही दागदागिना गहाण ठेवला तर पैसे मिळतील. आपल्याजवळ काय आहे?'

'तो सावकार बरा आहे म्हणतात. या गावी नाही राहात. तो चार कोसांवर एक गाव आहे, तेथे राहतो.?'

'मला माहीत आहेत ते. तुमच्या वडिलांवर ते लोभ करीत असत. होय ना? सारे सावकार तुमच्या वडिलांवर लोभ करीत आणि लोभामुळे सारी शेतीवाडी, सारे घरदारही त्यांनी घेतले. सावकाराची माया उगीच नसते. त्याचे प्रेम वरपांगी असते; त्याचे गोड शब्द वरवर असतात. कुळाचे सारे केव्हा घशात घालायला मिळेल इकडे त्याचे लक्ष असते. तुम्ही या जाऊन. तो पैसे देणार नाही.'

गोप्या तिसरे प्रहरी जायला निघाला. दिवे लागताना तो सावकाराच्या घरी पोचला. श्रीपतराव अंगणात आरामखुर्चीत होते.

'रामराम! गोप्या म्हणाला.

'रामराम. गोप्या. तिन्हीसांजा रे कोठे इकडे?'

'बायको फार आजारी आहे. तुमच्याजवळ थोडे पैसे मागायला आलो आहे बघा. डॉक्टर न्यायला हवा. जवळ दिडकी नाही.

बायकोने अंथरूण धरले. घरात मुलेबाळे. कसे करायचे? द्या थोडे पैसे. पंचवीस रूपये तरी द्या. बायको बरी होऊ दे. तुमचे पैसे लौकरच देऊ. ठेवणार नाही.'

'अरे कोठून देणार पैसे? ते बापूसाहेब तुझ्याकडची जमीन सुध्दा काढून घ्यायला हवी, असे म्हणत होते. तू दोन वर्षे खंडही पुरा देत नाहीस. आणखी हे कर्ज कशाला?'

'शेतात पिकलेच नाही. घरी आम्हीलाही खायला नाही. बायको उपाशी राहात असे. बापूसाहेबांना बोलायला काय? तुम्ही द्या पैसे. एवढी अडचण दूर करा. बायको हिंडतीफिरती होऊ दे. दया करा.'

'गोप्या, डॉक्टरच्या एका इंन्जेक्शनाने का गुण येणार आहे? एकदा सुई टोचून भागत नाही. पाचपाच दहादहा वेळा सुई टोचून घ्यावी लागते. कोठून आणशील इतके पैसे? अरे, गरिबांनी या डॉक्टरांच्या नादी लागू नये. झाडपाल्यांची औषधे तुम्ही करावी. पाले आणावे, मुळे आणावी. काढा करावा; रस काढावा. डॉक्टर नको, कोणी नको. पाल्याला, मुळांना काही तोटा नाही. जावे जंगलात, आणावी भरपूर औषधे. मी सांगतो तुला औषध. काय होते तुझ्या बायकोला?'