गोप्या 18
'तू दिनू-विनूला भाकर दे. तूही खाऊन घे. त्यांच्यासाठी झाकून ठेव.'
'आई, तुला काय देऊ? पुन्हा रस काढून देऊ?'
'मला पोटभर पाणी दे. जीव सुकला.'
ताराने आईच्या तोंडात पाणी घातले. नंतर ती उठली. तिने भावंडाचे जेवण केले. एका घोंगडीवर ते दोघे छोटे भाऊ झोपले. तारा आईजवळ होती.
'तू ही झोप. दमलीस. मला काही लागले तर उठवीन.'
'आई, तू बाहेर जाऊन दमली असशील.'
'मला जाववले नाही तर तुला हाक मारीन. मग हात धरून ने नि बसव अंगणाच्या कडेला. जाववेल तोवर मी जाईन. तू झोप आता.'
ताराही झोपली, तीन मुले तेथे झोपली होती. मंजी मधून मधून शौचास जात होती. एकदा ती शौचाहून आली नि जरा अंथरूणात बसली. तिने आपल्या तिन्ही लेकरांकडे पाहिले. ती उठली. तिने दिनू नि विनू यांचे मूके घेतले. त्यांच्या डोक्यावरून, तोंडावरून, सा-या अंगावरून तिने आपला हात फिरविला. नंतर ती ताराजवळ बसली. तिच्या केसांवरून तिने हात फिरविला.
'गुणी पोर' असे म्हणून तिचा तिने मुका घेतला. इतक्यात कळ आली पोटात. ती पुन्हा बाहेर जाऊन आली. आणि अंथरूणात पडून राहिली. आता ती अगदीच थकली. बाहेर जाणे आता शक्य नव्हते. तिच्या डोळयांत पाणी आले. तो पुन्हा पोटात कळ! ती उठली; परंतु उभे राहवेना. ती मटकन् खाली बसली.
'तारा, तारा,' तिने हाक मारली.
'काय आई?' तिने एकदम उठून विचारले.
'मला नाही ग बाहेर जाववत. माझा हात धरून ने. मी तुला इतका वेळ उठविले नाही; हाक मारली नाही. दिवसभर तू दमतेस. परंतु तुझ्या आईला आता शक्ती नाही हो. धर मला. मी कधी तुला काम सांगत नसे. करवत असे तोपर्यंत करीत होते. परंतु
आता नाही इलाज. गरीब आईबापांना देव कशाला देतो मुले?'
'आई, चल, मी तुला धरते.'
ताराने आईला हात धरून नेले. अंगणाच्या कडेला ती बसली. बसवेना. तिने तेथेच डोके टेकले. शेवटी कशी तरी एकदाची पुन्हा ती घरात आली. तारा पाय चेपीत बसली. ती मुलगी रडू लागली.
'ते नाही का अजून आले घरी?'
'नाही, आई.'
'यांना काळवेळ काही समजत नाही.'
'सारे समजते. हा बघ मी आलो. बरे वाटते की नाही? तारा, कसे आहे ग?' गोप्या येऊन म्हणाला.
'बाबा, आईचे अधिकच आहे. सारखे शौचाला होते. आई अगदी गळून गेली आहे.'