Get it on Google Play
Download on the App Store

गोप्या 30

'गोप्या, हा चावटपणा तू सुरू केलास का? शेतकरी-संघ काढणार वाटते आता? काँग्रेसच्या नादी लागू नका. उद्या तुरूंगात जाल, फुकट मराल.'

'नाही तरी किडयासारखे मरतच आहोत. आम्ही खंडोगणती धान्य पिकवितो; परंतु आम्ही उपाशी असतो. या गोप्याची बायको उपाशी राहून राहून मेली.'

'गप्प बसा. कामाला लागा; आणि गोप्या, तू अशी फंदफितुरी करशील तर खबरदार! गावात भांडणे माजवू नको. तेढ उत्पन्न करू नको. ते बापूसाहेब तुझ्याकडून जमीन काढून घेऊ म्हणतात, ते उगीच नाही. उद्या त्या जमिनीचा तूच मालक होऊन बसायचास!'

'आमचीच जमीन आहे ही. तुम्ही चोर आहात सारे. दामदुपटी करून सा-या जमिनी घेतल्यात. सवाई, दिढी असे तुमचे प्रकार. यंदा मणभर धान्य द्यायचे आणि पुढील वर्षी सव्वा मण, दीड घ्यायचे. याचा अर्थ शंभर रूपये देऊन त्याचे सव्वाशे, दीडशे लगेच घ्यायचे. आणि अशी व्याजे भरता आली नाहीत, बाकी थकली की सारे तुम्ही घशात घालायचे. राक्षस आहात राक्षस!'

'गोप्या, जपून बोल.'

'इतके दिवस जपून बोललो. परंतु बायको-मुले उपाशी राहून तडफडून मरत आहेत. तरीही का जपून बोलू? हा गोप्या आता पेटला आहे. तो सर्वांना पेटवील. येथे गरिबांचे राज्य आम्ही सुरू करू.

'काँग्रेस का हे शिकविते?'

'आज ना उद्या काँग्रेस हेच करणार! मला खात्री आहे.'

'गरिबांसाठी गांधीजी आहेत. गरिबांसाठी नेहरू आहेत. आम्ही संघटना करणार. वेळ आली म्हणजे, काँग्रेसचा हुकूम झाला म्हणजे आम्ही बंड करणार, उघड बंड.'

'मरशील, फाशी जाशील !'

'तसे झाले तर माझ्यावर पोवाडे होतील, आमचे नवीन रामायण-महाभारत कोणी लिहील!'

'जा रे माकडांनो!'

'माकडांनीच पराक्रम केले नि सोन्याच्या लंका जाळल्या आणि माकडांचा पराक्रम सांगण्यासाठीच रामायण लिहावे लागले.'

'पुरे, पुरे! गोप्या, तू असला चावटपणा करशील तर याद राख! फाजीलपणे बोलत जाऊ नकोस. नाही तर. तुला कोणीही कामावर बोलावणार नाही असे आम्ही करू. तुझ्याकडचे शेतही का़डून घ्यायला सांगतो. फार माजलास तू.'

'शेतक-यांना पिळून तुम्ही माजला आहात.'

'गोप्या, तोंड संभाळून बोल.'

'आधी तुम्ही आपले सांभाळा. तुम्ही आधी मला म्हणालेत की 'माजलात'. तुम्ही का पोसता मला? आम्ही तुम्हा सर्वांना पोसतो. कृतघ्न आहात सारे. चोर आहात तुम्ही. दरोडेखोर आहात तुम्ही.'

'गोप्या, चालता हो येथून.'

'हा निघालो मी.'