प्रवेश सोळावा 1
प्रवेश सोळावा
(लक्ष्मीधरपंत आपल्या दिवाणखाण्यांत बसले आहेत. पलंगावरच्या स्वच्छ आंथरूणावर आजारांतून उठलेला नारायण आहे.)
नारायण - बाबा, मजवरचा सगळा राग गेला ना ? मी करीत असलेलं काम तुमच्या बरंच मनाविरूध्द झालं !
लक्ष्मीधरपंत - बाळ, नको रे पुन्हा असं बोलू ! कसला रे राग ! तें झालं गेलं आतां तें सारं विसरलं पाहिजे. (कारकून येतो.)
कारकून - रामजी शेतकरी आला आहे.
लक्ष्मीधरपंत - मग रामजीला इथंच घेऊन या.
कारकून - (आश्चर्यानें ) इथें दिवाणखान्यांत ?
लक्ष्मीधरपंत - हो, येथें दिवाणखान्यांत, इथं मी बसलों आहें इथं आणा. गरिबांत व आपणांत कसला भेद ?
(कारकून जातो. रामजी आपला मुलगा विश्राम यासह प्रवेश करतो.)
रामजी - रामराम, दादा !
लक्ष्मीधरपंत - राम !काय रामजी, बस. बसण्यास संकोच नको करूं. बसरे बाळ ! (रामजी व विश्राम अदबीनें बसतात.)
लक्ष्मीधरपंत - रामजी, यंदाहि पिकं बरीं नाहींत ना ?
रामजी - प्रथम पीक बरं हातं, परंतु मागूनच्या संततधारेनं नुकसान झाल. आलेल सारं गेलं.
लक्ष्मीधरपंत - देव ठेवील तसं राहिलं पाहिजें.
रामजी - आमची देव तुम्हीच ! दादा, तुम्ही दया कराल तरच आम्हीं जगूं ! मी आपणास पैशाच विचारवयास आलों होतों. घरीं एक पै नाहीं. माझी पोर गेली. तिच्या आजारांत औषधपाण्याची नीट तरतूद झाली नाहीं. बायको आजारी आहे. काय करूं ? (रामजीच्या डोळयास पाणी येतें; विश्राम डोळे चोळतो.)
लक्ष्मीधरपंत - रामजी, तूं पैशाची काळजी नको करूं. खरं म्हटलं तर आजपर्यंत जें व्याज घेतलं त्यानंच माझ्या पैशांची फेड झाली आहे, समजलास ? माझं देणं तूं आतां मुळींच लागत नाहींस. (कारकुनाकडे वळून) तो कर्जरोखा फाडून यांस ' सर्व देणं पावलं ' असं लिहून द्या.